Bihar liquor seized train First AC
समस्तीपूर : बिहारमधील समस्तीपूर येथे 'स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस'च्या एसी फर्स्ट क्लास डब्यात ७५ लिटर ब्रँडेड दारूसह प्रवास करणाऱ्या एका २५ वर्षीय तरूणीला अटक करण्यात आली. मॉडेलसारखी दिसणारी ही तरूणी वैध तिकिटाशिवाय प्रवास करत होती. नेहा झा असे तिचे नाव आहे. पोलिसांनी विदेशी दारूचा साठा जप्त केला असून चौकशीदरम्यानचा तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेहा तिचा नातेवाईक ईशान कुमार याच्यासोबत नवी दिल्लीहून फर्स्ट एसी डब्यातून सुमारे १,१०० किलोमीटरचा प्रवास करून बिहारमध्ये पोहोचली होती. ही सीट ईशानच्या नावावर आरक्षित होती, तर नेहा विनातिकीट प्रवास करत होती.
समस्तीपूर जंक्शनवर रेल्वे थांबताच रेल्वे पोलिसांनी डब्याकडे धाव घेतली. आतून कडी लावलेली होती. वारंवार दार ठोठावल्यानंतर नेहाने दार उघडले. या संपूर्ण कारवाईचे अधिकाऱ्यांनी व्हिडिओ शूटिंग केले आहे. डब्याची झडती घेतली असता, तब्बल दीड लाख रुपये किमतीची ७५ लिटर विदेशी दारू सापडली. याप्रकरणी नेहा आणि ईशानला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
नेहा दरभंगा येथील सिंघिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारी गावची रहिवासी असून ती चार बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. दरभंगा येथील के.एस. कॉलेजमधून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे तिच्या कुटुंबाची पार्श्वभूमीही पोलिसांच्या रडारवर आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तिच्या वडिलांना दोन वर्षांपूर्वी दारूच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तर तिची मोठी बहीण निशू झा हिला ३० नोव्हेंबर २०२५ रोजी २१ लिटर विदेशी दारूसह उत्पादन शुल्क विभागाने अटक केली होती. नेहाच्या भावांपैकी एक जण शाळेत शिकत असून, दुसरा मुलगा 'नीट' परीक्षेत अपयशी ठरल्यानंतर व्यसनाधीन झाला होता. त्याच्यावर मुझफ्फरपूर येथील व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरू होते.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्राथमिक चौकशीत नेहाने डिसेंबर महिन्यात घरात असणाऱ्या लग्नसमारंभासाठी हरियाणातून ही दारू आणल्याचा दावा केला आहे." मात्र, हे कारण खरे आहे की दारू तस्करी लपवण्यासाठी दिले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी नेहा आणि ईशानचे मोबाईल जप्त केले आहेत. नेहाच्या मोबाईलमध्ये दरभंगामधील अनेक नामांकित डॉक्टर आणि उद्योगपतींचे नंबर पोलिसांना सापडले आहेत. त्यामुळे या दारू तस्करीत बड्या लोकांचे कनेक्शन आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.