RBI gold reserves: सरकारने १२ अब्ज डॉलर्सचे सोने विकले? आरबीआयने पहिल्यांदाच सांगितले संपूर्ण सत्य

भारतीय रिझर्व्ह बँकेने तब्बल १२ अब्ज डॉलर किमतीचे सोने विकल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला होता.
RBI
RBI file photo
Published on
Updated on

RBI gold reserves

नवी दिल्ली: अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील परकीय चलन साठ्याचे रक्षण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने तब्बल १२ अब्ज डॉलर किमतीचे सोने विकल्याचा दावा 'ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्स'च्या अहवालात करण्यात आला होता. मात्र, आरबीआयने आज (दि. ३) हा दावा फेटाळून लावत तो चुकीचा असल्याचे सांगितले. तसेच, बँकेकडे असलेल्या सोन्याच्या भौतिक साठ्यात कोणताही बदल झालेला नसून तो ८८०.५२ टनांवर कायम असल्याचे स्पष्ट केले.

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, काही माध्यमांमध्ये आरबीआयने सोने विकल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, त्या वस्तुस्थितीला धरून नाहीत. केंद्रीय बँकेच्या मासिक बुलेटिनमध्ये सोन्याच्या भौतिक साठ्याची माहिती नियमितपणे जाहीर केली जाते आणि सध्याच्या घडीला हा साठा ८८०.५२ टन इतकाच कायम आहे. तसेच, आरबीआयने नागरिकांना अशा विषयांमध्ये केवळ बँकेकडून अधिकृतपणे प्रसिद्ध होणाऱ्या माहितीलाच महत्त्व देण्याचे आवाहन केले आहे.

RBI
अर्थवार्ता : गुगलचा भारतात 'एआय' धमाका! विशाखापट्टणम येथे 15 अब्ज डॉलर्सच्या एआय हबची घोषणा

PIB चेही फॅक्ट-चेक

आरबीआयच्या स्पष्टीकरणानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोन संबंधित वृत्ताचे फॅक्ट-चेक करत ब्लूमबर्गच्या अहवालातील दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत, "आरबीआयने सुमारे १२ अब्ज डॉलरचे सोने विकले असावे, असा दावा करणारा अहवाल चुकीचा आहे," असे स्पष्ट केले.

पीआयबीने म्हटले आहे की, 'भारताच्या विदेशी चलनसाठ्यातील सोन्याचा वाटा सप्टेंबर २०२५ अखेरीस १३.९२ टक्के होता. तो ३१ मार्चपर्यंत १६.७० टक्क्यांवर पोहोचला आणि २२ मेपर्यंत आणखी वाढून १६.८५ टक्के झाला. त्यामुळे आरबीआयने सोने विकले नसून उलट विदेशी चलनसाठ्यात सोन्याचे महत्त्व वाढल्याचे दिसून येते.'

'ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्स'च्या अहवालात काय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या साठ्यातील सोन्याचा काही भाग विकला असण्याची शक्यता 'ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्स'ने व्यक्त केली होती. सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीचा अभ्यास करून  'ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्स'ने हा अहवाल प्रसिद्ध केला होता. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सचे वरिष्ठ भारतीय अर्थतज्ज्ञ अभिषेक गुप्ता यांनी, २२ मे पर्यंतच्या दोन आठवड्यांत आरबीआयने अंदाजे १२ अब्ज डॉलर्स मूल्याच्या सोन्याची विक्री केली असण्याची शक्यता वर्तवली होती. याच काळात बँकेने ७.५ अब्ज डॉलर्सचे परकीय चलन खरेदी केले. विशेष म्हणजे, या काळात सरकारने मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवले होते, ज्यामुळे बँकेकडील सोने आणि डॉलर्सचे मूल्य वाढायला हवे होते. तरीही सोन्याच्या साठ्यात झालेली घट ही आरबीआयने सोन्याची विक्री केल्याचे संकेत देते, असे गुप्ता यांनी नमूद केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news