

Ratnagiri Jackfruit Products
प्रशांत वाघाये
नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एकीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या विवाहानंतरच्या स्वागत समारंभाची लगबग सुरू होती. याच कार्यक्रमात शरद पवार यांनी रत्नागिरीतील तरुण शेतकरी मिथिलेश देसाई यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवून आणली. या भेटीत देसाई यांनी फणस, त्याच्या विविध घटकांपासून तयार केलेली पावडर, फणसाचे गरे तसेच फणसाच्या सालीपासून तयार केलेली बॅग आणि पासपोर्ट होल्डर पंतप्रधान मोदींना भेट दिले.
पंतप्रधान मोदींनी मिथिलेश देसाई यांचे कौतुक करत त्यांनी दिलेल्या सर्व गोष्टी ते अगदी आनंदाने सोबत घेऊन गेले. मिथिलेश जोशी यांनी एखादे वर्ष ‘फणस वर्ष’ साजरे व्हावे अशी विनंती केली, त्यालाही पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. स्वागत समारंभाच्या निमित्ताने झालेल्या या अनपेक्षित भेटीची चर्चा उपस्थितांमध्ये चांगलीच रंगली.
मिथिलेश देसाई हे रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा येथील तरुण शेतकरी आहेत. हातखंब्यासह लांजा तालुक्यातील झापडे येथे त्यांची फणसाची शेती आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये बी.टेक. केलेल्या देसाई यांनी पारंपरिक नोकरी किंवा अन्य व्यवसायाचा मार्ग न निवडता पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. फणसाच्या माध्यमातून शेतीला संशोधन, प्रक्रिया आणि बाजारपेठेची जोड देण्याचे काम त्यांनी सुरू केले. देसाई यांच्या वडिलांनी १९७२ पासून व्यावसायिक पद्धतीने फणसाची शेती आणि विक्री सुरू केली.
हातखंबा येथे अवघ्या ५० पैशांपासून रस्त्यावर फणस विकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज संशोधन आणि प्रक्रिया उद्योगापर्यंत पोहोचला आहे. फणसाकडे भविष्यातील पीक म्हणून पाहण्याची दूरदृष्टी त्यांच्या वडिलांनी सुरुवातीपासूनच ठेवली आणि विविध जातींची लागवड सुरू केली. आज वडिलांची शेती मिथिलेश देसाई सांभाळत असून, त्यांच्या २८ एकरांच्या शेतीत जगभरातील १२८ पैकी ८८ फणसांच्या जातींचे संकलन आणि लागवड करण्यात आली आहे. या विविध जातींवर पुढील संशोधनही सुरू आहे.
शरद पवार यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मिथिलेश देसाई यांनी ‘पुढारी’शी खास संवाद साधला. फणस म्हणजे केवळ कोकणातील पारंपरिक फळ नव्हे, तर भविष्यात भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याची क्षमता असलेले पीक आहे. शेकडो वर्षांपासून आपण फणसाचे झाड पाहत आलो आहोत. मात्र, त्याकडे केवळ फळ म्हणून न पाहता संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. आंबा, नारळ आणि काजूसाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणात फणसालाही मोठी व्यावसायिक क्षमता आहे. फणसाची साल, गरे, पाने आणि बिया अशा झाडाच्या जवळपास प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो. त्यामुळे आम्ही फणसाला कल्पवृक्ष म्हणतो,’ असे देसाई म्हणाले. फणसाच्या पानांवरही विविध संशोधन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या पानांमध्ये औषधी गुणधर्म असण्याबाबतही संशोधन होत असल्याचा दावा त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान देसाई यांनी फणस आणि फणसापासून तयार केलेली विविध मूल्यवर्धित उत्पादने भेट दिली. यात फणस, मिल्कशेक आणि आईस्क्रीमसाठी वापरता येणारी कच्च्या गऱ्यांची पावडर, फणसाच्या आठळीची (बियांची) पावडर आणि फणसाचे गरे यांचा समावेश होता. तसेच फणसाच्या सालीपासून तयार केलेली बॅग आणि पासपोर्ट होल्डर ही उत्पादनेही त्यांनी मोदींना भेट दिली. फणसाच्या झाडाचा केवळ गरच नव्हे, तर साल, पाने आणि बियांचाही उपयोग करता येतो, हे या उत्पादनांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे देसाई यांनी सांगितले.
देशातील सुमारे ९० टक्के भागात फणस नैसर्गिकरीत्या आढळतो. अतिशय हिमवृष्टी होणारे भाग वगळता देशातील मोठ्या भूभागात फणसाचे अस्तित्व आहे. त्यामुळे या पिकाकडे राष्ट्रीय पातळीवर पाहण्याची गरज आहे. देशात विविध क्षेत्रांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ज्या पद्धतीने वर्ष साजरे केले जाते, त्याच धर्तीवर ‘फणस वर्ष’ साजरे केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दुग्ध उत्पादनात भारत जगात अग्रगण्य आहे. त्याच धर्तीवर फणसाच्या उत्पादनातही भारताला अग्रस्थानी नेता येऊ शकते, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. शासनाची साथ मिळाल्यास फणस शेती आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित करता येईल, असे ते म्हणाले. फणसाचे झाड दीर्घायुषी असून काही झाडे १०० ते ३०० वर्षांपर्यंत जगतात. त्यामुळे दीर्घकालीन कृषी नियोजनात फणसाला स्थान देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रातील प्रयोगशील तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेबद्दल देसाई यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विशेष कौतुक करत आभार मानले. ‘कृषी क्षेत्रातील विविध गोष्टींना या पातळीवर महत्त्व देणारी व्यक्ती मी फारशी पाहिलेली नाही. शेती हा कायमच त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. तरुण मुला-मुलींनी शेतीत संशोधन करून काही वेगळे काम केले, तर त्यांना ताकद आणि संधी देण्याचे काम शरद पवार यांनी नेहमी केले आहे,’ असे देसाई म्हणाले. ‘गेल्या सात वर्षांपासून ते माझा प्रवास जवळून पाहत आहेत. वडिलांच्या पारंपरिक शेतीनंतर शून्यापासून सुरू झालेल्या माझ्या प्रवासाचे ते साक्षीदार आहेत आणि त्यांनी मला मोठी मदत केली. मात्र, राष्ट्रीय पातळीवर या कामाला आणखी मदत मिळायला हवी,’ अशी अपेक्षाही देसाई यांनी व्यक्त केली.
सध्या हॉटेल क्षेत्रात फणसापासून तयार होणाऱ्या उत्पादनांची उपलब्धता फार मोठ्या प्रमाणात नाही. काही हॉटेलमध्ये फणसाच्या उत्पादनांचा वापर सुरू झाला आहे. मात्र, कच्च्या मालाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने फूड प्रोसेसिंगवर अधिक भर देत आहोत. फणसाचा वापर विशेषतः ‘व्हेजिटेरियन मीट’ म्हणून मोठ्या प्रमाणात होत आहे. मांसाहारी पदार्थांना शाकाहारी पर्याय म्हणून फणसाचा वापर होत असल्याने या क्षेत्रात मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते. मात्र, त्यासाठी प्रक्रिया, साठवणूक, बाजारपेठ आणि पुरवठा साखळी यांना शासनाची मदत मिळणे आवश्यक असल्याचे देसाई यांनी सांगितले.