नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
बिहारमध्ये काँग्रेसने राजकीय मैदान जिंकण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली आहे. त्यासाठी काँग्रेसने जुन्या नेत्यांची घरवापसी मोहीम सुरू केली आहे. जनता दल संयुक्तचे नेते राम जतन सिन्हा यांनी बुधवारी (दि.14) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बिहारमध्ये काँग्रेसला फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी जदयूला दणका देत काँग्रेसने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची व्होट बँक फोडण्याचा प्रयत्न केला आहे. राम जतन सिन्हा हे उच्चवर्णीय आहेत. राम जतन सिन्हा आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह हे दोघेही एकाच जातीत येतात. या जातीच्या मतदानावर भाजपची पकड असल्याचे मानले जाते. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांच्या जातीने भाजपला उघड पाठिंबा दिला होता. भाजप आणि जदयूसोबत निवडणूक लढवून या जातीची ९० टक्के मते एनडीएला मिळवून दिली होती. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात स्पष्टपणे दिसून आला.
बिहारमध्ये मागास जातींवर राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि जदयूचे नियंत्रण आहे. उच्चवर्णीय बहुधा भाजपच्या पाठीशी उभे आहेत. पूर्वी या जाती काँग्रेसच्या बाजूने होत्या. बिहारमध्ये काँग्रेसची व्होट बँक दलित, काही मागासवर्गीय जाती होती. परंतु मंडल आयोगाच्या उदयानंतर मागास जाती काँग्रेसपासून पूर्णपणे विभक्त झाल्या. त्याच वेळी भाजपने उच्चवर्णीयांवर आपली पकड निर्माण केली.
दलित समाजातील मते लोक जनशक्ती पक्षाच्या बाजूने गेली. त्यामुळे काँग्रेसची व्होट बँक पूर्णत: मोडकळीस आली. त्यामुळेच बिहारमध्ये काँग्रेसचे फक्त नेते उरले आहेत, कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात गेले आहेत. काँग्रेसने पुन्हा आपली जुनी व्होट बँक परत मिळवण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली आहे. राज्यात मित्रपक्ष म्हणून आरजेडी सोबत युती केल्यामुळे काँग्रेसला अद्याप मागासवर्गीय राजकारणात उतरायचे नाही. रामविलास पासवान यांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेसची नजर दलितांच्या व्हॉट बँकेवर आहे.राम जतन सिन्हा यांची घरवापसी हा याच राजकीय खेळीचा एक भाग आहे. सिन्हा यापूर्वी बिहार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. पण २००५ मध्ये ते जदयूमध्ये दाखल झाले. आता त्यांचा जदयू अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये परतले आहेत.