

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची निवासस्थाने आरडीएक्स वापरून उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा मेल अज्ञाताकडून आला असून, मेल आयडीद्वारे पत्ता शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
11 ऑक्टोबर रोजी एका विशिष्ट आयडीवरून तामिळनाडूच्या डीजीपींना ईमेल पाठवण्यात आले आणि कर्नाटक पोलिस अधिकाऱ्यांना तत्काळ सतर्क करण्यात आले. त्यानंतर आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या, असे बंगळूर शहर पोलिस आयुक्त सिमंतकुमार सिंग यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चार किलो आरडीएक्स आणि सुधारित स्फोटके ठेवण्यात आली आहेत, त्यांचे रिमोटद्वारे स्फोट केले जातील, असे ई-मेलमध्ये लिहिले आहे. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्बशोध पथकाने दोन्ही निवासस्थानांची तपासणी केली. मात्र कोणतेही स्फोटक सापडले नाहीत, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय दंड संहितेच्या कलम 351(4) (गुन्हेगारी धमकी) आणि 353(1)(ब) (सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार घडवण्याची शक्यता असलेली विधाने) अंतर्गत हलसुरु गेट पोलिस ठाण्यात स्वतःहून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तामिळनाडूतील एका व्यक्तीचा ईमेल आयडी ट्रॅक करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ईमेलद्वारे वारंवार अशाच प्रकारच्या धमक्या आणि माहिती येत आहेत. धमकी देणारे ईमेल पाठवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी एक विशेष तपास पथकही स्थापन करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
बंगळूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या कार्यक्रमांना सरकारी स्थळे उपलब्ध करून देऊ नका, अशी मागणी करणाऱ्या पंचायतराज विकासमंत्री प्रियांक खर्गे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मंगळवारी खर्गे यांनीच ही माहिती दिली.
आमच्या कुटुंबीयांना आणि मला जीवे मारण्याची धमकी देणारे फोन येत आहेत. दोन दिवसांपासून हे फोन येत असल्याचे खर्गे म्हणाले.
गेले दोन दिवस कुटुंबिय आणि माझ्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल्स येत आहेत. फोन उचलताच शिवीगाळ सुरू होते. तुमच्या कुटुंबियांना जीवे मारू, अशी धमकी दिली जाते. दोन दिवसांपूर्वी आरएसएसच्या कार्यक्रमांसंबंधी विधान केल्यानंतर हे फोन येत आहेत. आणि मला धमकी दिली जात आहे, असेही खर्गे यांनी सांगितले.