Viral Video : रेल्वेच्या चादरीवर डल्ला! महिला प्रवासी रंगेहात सापडली, 'तिकीट काढलंय, तर...' : अजब युक्तिवादाचा व्हिडिओ व्हायरल

"२५० च्या तिकिटात ५०० ची चादर वसूल!" रेल्वे प्रवाशाचा भन्नाट 'बिझनेस प्लॅन' कॅमेऱ्यात कैद
Viral Video : रेल्वेच्या चादरीवर डल्ला! महिला प्रवासी रंगेहात सापडली, 'तिकीट काढलंय, तर...' : अजब युक्तिवादाचा व्हिडिओ व्हायरल
Published on
Updated on

नवी दिल्ली : रेल्वे स्थानकावर सोबत पती, कडेवर लहान मूल आणि हातात सूटकेस… वरवर पाहता सर्वकाही अत्यंत सामान्य वाटत होते; मात्र सूटकेस उघडताच एक धक्कादायक प्रकार समोर आला. या बॅगेत भारतीय रेल्वेची अधिकृत चादर गुंडाळून ठेवलेली आढळली. ही चादर घरी नेण्याचा नेमका हेतू काय, असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला, तेव्हा महिलेने दिलेले स्पष्टीकरण ऐकून सर्वच अवाक झाले. सध्या या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती संबंधित महिलेला चादरीबाबत जाब विचारताना दिसत आहे. “तुम्ही लोक असेच प्रकार करता का? चादरींची चोरी करता का?” असा थेट सवाल तो विचारतो. यावर ती महिला संतापून उत्तर देते, “वाटेल ते बोलू नका, तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल तर खुशाल काढा.” पुढे ती महिला या कृत्याचे कारण सांगताना धक्कादायक खुलासा करताना दिसते. ती म्हणते की, ‘‘प्रवासादरम्यान टीसीने आमच्याकडून जादाचे पैसे उकळले होते. त्याल्यामुळे त्याची भरपाई म्हणून मी रेल्वेची चादर सोबत नेत आहे.’’

वास्तविक पाहता, एसी डब्यांमध्ये प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या चादरी, ब्लँकेट अथवा उशा या केवळ प्रवासादरम्यानच्या सोयीसाठी दिलेल्या सुविधा असतात. प्रवास संपल्यानंतर हे साहित्य रेल्वे प्रशासनाकडे जमा करणे बंधनकारक असते; ते घरी घेऊन जाणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. अशा परिस्थितीत महिलेने केलेला हा अजब दावा सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना महिलेचा हा युक्तिवाद हास्यास्पद वाटत आहे, तर काही जण प्रवाशांच्या अशा बेजबाबदार मानसिकतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ही घटना कॅमेऱ्यात कैद होत असताना महिला तिच्या कडेवरील मुलासह बॅगेजवळ उभी असल्याचे दिसते.

सदर व्हिडिओ नेमका कोणत्या रेल्वे स्थानकावरील आणि कधीचा आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ‘तिकीट काढले आहे, तर चादर नेण्याचा हक्क आमचाच’ अशा थाटात महिलेने दिलेले हे स्पष्टीकरण पाहून, तिकिटाच्या पैशात रेल्वेच्या साहित्याची मालकी कधीपासून मिळू लागली, असा उपरोधिक सवाल आता नेटक-यांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news