

Rahul Gandhi on EC
बेंगळुरू : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी बेंगळुरूमधून निवडणूक आयोगावर (Election Commission) आजवरचा सर्वात तीव्र आणि थेट हल्ला चढवला.
निवडणूक प्रक्रियेत भाजप आणि निवडणूक आयोगाने संगनमत करून "मतांची चोरी" केली असल्याचा त्यांनी आरोप केला आणि "संविधानावर हल्ला केलात, तर खबरदार. संविधानावर हल्ला करण्यापुर्वी दोनवेळा विचार करा. नाहीतर आम्ही एकेकाला पकडू! वेळ लागेल पण नक्की पकडू," असा इशारा दिला.
राहुल गांधी हे बेंगळुरूमधील 'फ्रीडम पार्क' येथे आयोजित सभेत बोलत होते. त्यांनी असा दावा केला की काल काँग्रेसने 100 टक्के पुरावे दिले आहेत की "निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून महाराष्ट्रात एका जागेसाठी 1.02 लाख मते चोरली."
राहुल गांधी म्हणाले की, "निवडणूक आयोगाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. जर तुम्ही मतदार यादी आणि निवडणूक व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्हाला देणार नसाल, तरी आम्ही एक नाही तर 10-15 जागांवर काम करणार आहोत. तुम्ही लपून बसू शकत नाही."
राहुल गांधी यांनी सांगितले की, बिहार, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये आज निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद होती. विशेषतः बिहारमध्ये मतदार याद्यांचे 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन' सुरू आहे आणि त्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या "तुमच्या आरोपांवर शपथपत्र द्या" या मागणीवर प्रत्युत्तर देताना म्हटले की, "मी खासदार आहे. मी आधीच संसदेत संविधान हातात घेऊन शपथ घेतलेली आहे. वेगळं शपथपत्र देण्याची गरज काय?"
राहुल गांधी यांच्या मते, "लोकसभा निवडणुकीत INDIA आघाडीने विजय मिळवला होता, पण फक्त 4 महिन्यांतच भाजपने विधानसभेत विजय मिळवला – हेच पुरेसं आहे की काहीतरी गडबड आहे.
या निवडणुकीत 1 कोटी 'नवीन' मतदार दिसले – जे लोकसभा निवडणुकीत दिसले नव्हते. त्यातील बहुतांश लोक 'भाजप नेत्यांच्या वन-बेडरूम घरांत' राहत असल्याचे मतदार यादीत नमूद आहे!"
राहुल गांधी यांनी असा दावा केला की, कर्नाटकमध्येही मतांची चोरी सुरू आहे, उत्तर प्रदेशमध्ये डुप्लिकेट मतदान सुरू आहे.
निवडणूक आयोग म्हणाले की, "राहुल गांधींनी जर खरोखरच विश्वास ठेवला असेल की त्यांचे आरोप खरे आहेत, तर त्यांनी ते शपथपत्रात सादर करायला काय हरकत आहे?"
भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर टीका करत म्हटलं आहे की, "त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही. ते फक्त राजकीय नौटंकी करत आहेत – लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन करण्यासाठी."
कर्नाटकमधील भाजप युनिटने सकाळीच काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. एका दीर्घ 'X' (माजी ट्विटर) पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेसवर आरोप केले. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट घोटाळा, ज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे.
मागासवर्गीयांसाठी असलेला 187 कोटी रुपयांचा निधी काँग्रेस नेत्याने गिळंकृत केल्याचा तसेच बंगळुरूच्या IPL विजय उत्सवात चेंगराचेंगरीचा आरोप, ज्यात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. यावर उत्तर द्या, असे म्हटले आहे.