

India Philippines Akash-1S Missile Defence Deal
नवी दिल्ली : दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी फिलीपिन्सने भारताच्या अत्याधुनिक 'आकाश-1एस' या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये रस दाखवला आहे. पाकिस्तानविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान लढाईतील यशस्वी वापरामुळे हे क्षेपणास्त्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानच्या फतेह-1 या मार्गदर्शित रॉकेटवर जवाबी कारवाई करताना ‘आकाश-1एस’ क्षेपणास्त्र वापरले होते.
अत्याधुनिक आणि गुप्तता राखणाऱ्या फतेह-1 रॉकेटला 5 किमी उंचीवर यशस्वीरित्या पाडण्यात भारताला यश आले. या घटनेनंतर भारताने त्या रॉकेटचे अवशेष जागतिक स्तरावर दाखवून आपली ताकद अधोरेखित केली.
'आकाश-1एस' ही मध्यम पल्ल्याची (Medium-Range) सर्फेस-टू-एअर क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी शत्रूच्या हवाई हल्ल्यांना त्वरीत प्रत्युत्तर देऊ शकते. ही प्रणाली 45 किमी पर्यंत अंतरावर आणि 20 किमी उंचीवर हल्ला करणाऱ्या लक्ष्यांवर अचूक मारा करू शकते.
देशी रेडिओ-फ्रीक्वेन्सी सेकर: यामुळे क्षेपणास्त्र अचूकतेने आणि वेगाने हालचाल करणाऱ्या लक्ष्यांवर निशाणा साधते.
राजेंद्र फेज्ड-अरे रडार प्रणाली: एकाचवेळी 64 लक्ष्य ट्रॅक करून 12 क्षेपणास्त्रांना मार्गदर्शन देऊ शकते.
उपयुक्तता: ड्रोन, क्रूझ मिसाइल्स आणि शॉर्ट रेंज बॅलिस्टिक रॉकेट्सविरुद्ध प्रभावी.
सध्या फिलीपिन्सकडे इस्रायली 'SPYDER' प्रणाली आहे, पण ती मर्यादित पल्ल्याची आहे. आकाश-1एस सामावल्याने त्यांना ड्रोन व रॉकेट हल्ल्यांविरुद्ध अधिक सशक्त सुरक्षा कवच मिळू शकेल. दक्षिण चीन समुद्रात चीनच्या आक्रमक धोरणाच्या पार्श्वभूमीवर ही आवश्यकता अधिक तीव्र झाली आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्रानंतर आता 'आकाश-1एस' देखील आंतरराष्ट्रीय बाजारात लोकप्रिय ठरत आहे. भारताने पूर्वी आयातदार म्हणून ओळख असताना आता एक उदयोन्मुख संरक्षण निर्यातदार म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. फिलीपिन्सकडून आलेली मागणी ही भारताच्या संरक्षण कुटनितीला नवे बळ देणारी आहे.
जर फिलीपीन्स आणि भारत यांच्यात 'आकाश-1एस' खरेदीसंदर्भात करार झाला, तर तो केवळ संरक्षण क्षेत्रातील व्यवहार न राहता, एक भूराजकीय घडामोडींसाठी निर्णायक टप्पा ठरू शकतो. चीनच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या देशांसाठी ही एक सकारात्मक घडामोड ठरेल.
एकंदरीत भारताचे ‘आकाश-1एस’ हे क्षेपणास्त्र आता केवळ देशांतर्गत नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली योग्यता सिद्ध करत आहे. पाकिस्ताननंतर आता चीनसारख्या बलाढ्य देशाच्या विरोधकांनाही हे शस्त्र आकर्षित करत आहे, हे भारताच्या वाढत्या जागतिक सामर्थ्याचे प्रतीक आहे.