

Rahul gandhi vs Election Commission
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवर गंभीर आरोप करत ती निवडणूक "बनावट" असल्याचा दावा केला आहे.
दिल्ली येथे झालेल्या ‘वार्षिक कायदा संमेलन 2025’ मध्ये बोलताना गांधींनी भारतीय निवडणूक आयोगावर थेट प्रहार केला आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेलाच “मृत” घोषित केले.
राहुल गांधी म्हणाले, “भारताची निवडणूक प्रणाली आता मृत झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी खूपच कमी बहुमतावर सत्तेवर आहेत. जर 15 जागा बनावटपणे जिंकल्या गेल्या नसत्या, तर आज ते पंतप्रधान असतेच नाहीत. आम्ही लवकरच देशासमोर पुरावे सादर करू.”
त्यांनी दावा केला की काँग्रेसकडे यासंबंधी “ओपन-अँड-शट” प्रकारचे स्पष्ट पुरावे आहेत आणि लवकरच देशासमोर ते "अणुबॉम्ब" प्रमाणे स्फोटक स्वरूपात सादर केले जातील.
राहुल गांधींनी भारतीय निवडणूक आयोगावरही थेट आरोप करत म्हटले की, “मतं चोरली जात आहेत आणि त्यात आयोग स्वतः सहभागी आहे.” त्यांनी सांगितले की, काँग्रेसने आपल्या स्तरावर सहा महिन्यांची सखोल चौकशी केली असून आयोगाच्या भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
“आमच्या तपासात अनेक बाबी समोर आल्या आहेत ज्या देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय धोकादायक आहेत. निवडणूक आयोगाने सहकार्य न केल्यामुळे आम्ही आमच्याच मार्गाने तपास केला. त्यातून जे निष्कर्ष समोर आले, ते अणुबॉम्बसारखे आहेत. हे पुरावे समोर आल्यावर लोकशाहीवरचा विश्वास हादरेल,” असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील दोषी अधिकाऱ्यांना थेट इशारा देताना म्हटले की, “कोणताही दोषी अधिकारी – कार्यरत असो वा निवृत्त – वाचणार नाही. हे कृत्य देशद्रोहासारखे आहे. आणि आम्ही हे सोडणार नाही.”
राहुल गांधींच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाने त्वरित प्रतिक्रिया देत सर्व दावे “निराधार, अतिशयोक्त व जबाबदारीशून्य” असल्याचे म्हटले आहे.
आयोगाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “प्रत्येक दिवशी असे खोटे आरोप केले जात असून आयोगाचे अधिकारी आपल्या जबाबदाऱ्या निष्पक्षपणे पार पाडत आहेत. राहुल गांधींना १२ जून रोजी अधिकृतरित्या संवादासाठी आमंत्रण देण्यात आले होते, मात्र त्यांनी कोणतेही प्रश्न अधिकृतपणे मांडले नाहीत.”
राहुल गांधींचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. दुसरीकडे भाजपकडून मात्र हे आरोप हास्यास्पद असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसच्या वतीने येत्या काही दिवसांत जाहीर होणाऱ्या पुराव्यांमुळे देशाच्या निवडणूक प्रक्रियेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहू शकतो, अशी शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.