

Rahul Gandhi on PM Modi
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलिकडच्या विधानांनंतर राष्ट्रीय राजकारण तापले आहे. काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल तीव्र केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करत म्हटलं की, "फरक समजून घ्या, साहेब."
राहुल गांधी यांनी गेल्या जूनमध्ये काँग्रेसच्या "संघटना निर्मिती मोहिमे" शी संबंधित एका कार्यक्रमात दिलेल्या भाषणातील एक उतारा देखील शेअर केला. यामध्ये राहुल गांधी म्हणाले होते की, ते भाजप आणि आरएसएसला चांगले ओळखतात. जर त्यांच्यावर थोडासा दबाव आणला तर ते लगेच पळून जातात. ट्रम्पने दुसऱ्या बाजूने फोन फिरवताच ते म्हणाले, मोदीजी, तुम्ही काय करत आहात! नरेंद्र, शरण जा! आणि हो साहेब म्हणत त्यांनी ट्रम्पच्या सूचनांचे पालन केले.
या भाषणात राहुल गांधींनी इंदिरा गांधींच्या काळाचीही आठवण करून दिली. ते म्हणाले की मोदी ट्रम्पसमोर शरण जातात, पण इंदिरांनी अमेरिकेला नतमस्तक केले होते. या भाषणादरम्यान राहुल गांधी म्हणाले की तुम्हाला तो काळ आठवेल जेव्हा फोन कॉल नव्हते, सातवा फ्लीट आला होता. १९७१ च्या युद्धात अमेरिकेने आपले विमानवाहू जहाज आणि शस्त्रे पाठवली होती. तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, 'मला जे करायचे आहे ते मी करेन.'
राहुल गांधींचा हा व्हिडिओ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर आला आहे. मंगळवारी एक दिवस आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी वॉशिंग्टनने दिल्लीवर ५०% कर लादल्यामुळे पंतप्रधान मोदी त्यांच्यावर नाराज आहेत. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, पंतप्रधान मोदी स्वतः त्यांना भेटायला आले होते. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, "सर, मी तुम्हाला भेटू शकतो का?" आणि मी म्हणालो, "हो." तथापि, ट्रम्प यांनी हे संभाषण कधी आणि कुठे झाले हे उघड केले नाही. या टिप्पण्यांवर सरकारकडून त्वरित कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.