

Raghav Chadha Punjab voter list : निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहीमअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पंजाबच्या मसुदा मतदार यादीतून राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्या नावापुढे 'कायमस्वरूपी स्थलांतरित' (Permanently Shifted) अशी नोंद करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी (आप) सोडणाऱ्या आणि भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असून, 'आप'चे नेतृत्व द्वेषाने जळत असल्याचा गंभीर आरोप चड्ढा यांनी केला आहे.
१३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या 'ASDD' (अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार) यादीमध्ये राघव चड्ढा यांचे नाव समाविष्ट आहे. पंजाबमधील सुमारे २०.६६ लाख (सुमारे ९.७ टक्के) मतदारांची नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली असून, त्यात चड्ढा यांचाही समावेश आहे. २०२२ मध्ये 'आप'च्या तिकिटावर पंजाबमधून राज्यसभेत गेलेल्या चड्ढा यांनी यावर्षी एप्रिलमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
"माझे मतदार ओळखपत्र मोहालीत नोंदणीकृत आहे. मग मला 'स्थलांतरित' कसे ठरवले जाऊ शकते? ही केवळ प्रशासकीय चूक नसून राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. जेव्हापासून मी 'आप' सोडली आहे, तेव्हापासून त्या पक्षाचे नेतृत्व रागाने जळत आहे. पंजाब पोलिसांचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा वापर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांविरोधात केला जात आहे," असा आरोप राघव चड्ढा यांनी केला.
लोकप्रतिनिधींसाठी (खासदार व आमदार) 'संरक्षित यादी'ची तरतूद असतानाही अधिकाऱ्यांनी त्याचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला. ही मतदार यादी अजून मसुदा स्वरूपात असून, याविरोधात कायदेशीर मार्गाने दुरुस्ती अर्ज सादर केल्याचे राघव चड्ढा यांनी स्पष्ट केले.
पंजाबच्या मतदार यादीतून नाव वगळले तरी राघव चड्ढा यांच्या राज्यसभा खासदारकीला कोणताही धोका नाही. लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ मधील २००३ च्या दुरुस्तीनुसार, राज्यसभेच्या खासदाराला तो ज्या राज्याचे प्रतिनिधित्व करतो, त्याच राज्याचा नोंदणीकृत मतदार असणे बंधनकारक नाही. दरम्यान, या पुनरीक्षण मोहिमेबाबत दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी १२ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, ऑक्टोबर २०२६ मध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.