

Rafale fuselage manufacturing India France defence deal Tata Dassault Make in India Hyderabad
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतर आता भारतीय संरक्षण दलांसाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. फ्रान्सचे राफेल हे लढाऊ विमानाची निर्मिती आता भारतातच केली जाणार आहे.
फ्रान्सच्या बाहेर राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज (मुख्य ढाचा) तयार करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. यासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि भारतातील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (TASL) यांच्यात करार झाले आहेत.
चार उत्पादन हस्तांतरण करारांनंतर हैदराबादमध्ये एक विशेष उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे केवळ भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना मिळणार नाही, तर देशाची संरक्षण स्वयंपूर्णतेकडे वाटचालही अधिक वेगाने होणार आहे.
Fuselage म्हणजे विमानाचा मुख्य ढाचा किंवा शरीर होय. सोप्या भाषेत सांगायचे तर फ्युझलाज म्हणजे विमानाचा तो भाग ज्यामध्ये पायलट, प्रवासी किंवा उपकरणे असतात. यालाच विमानाची मुख्य फ्रेम किंवा बॉडी म्हणता येईल.
Wings (पंख), Cockpit (कॉकपिट), Tail (शेपूट), इंजिन्स हे विमानाचे इतर विभाग आहेत.
राफेलचा फ्युझलाज तयार करणे म्हणजे त्या संपूर्ण विमानाच्या बांधणीतील सर्वात मोठा आणि तांत्रिक दृष्ट्या महत्त्वाचा भाग भारतात तयार होणार आहे, हे मोठे यश आहे. ही केवळ संरक्षण उत्पादनक्षेत्रातील प्रगतीच नव्हे तर भारत-फ्रान्स संबंधातील दृढ विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे.
डसॉल्ट एव्हिएशन (Dassault Aviation) व टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (TASL) यांनी चार उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षऱ्या करत भारतात राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज (विमानाचे मुख्य ढाचे) तयार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
या करारानुसार भारतात, विशेषतः हैदराबादमध्ये, एक स्वतंत्र उत्पादन सुविधा स्थापन होणार आहे आणि ती केवळ भारतासाठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मागणीसाठीही फ्युझलाज पुरवणार आहे.
ही बाब विशेषत्वाने महत्त्वाची ठरते कारण ही फ्रान्सबाहेरची पहिली राफेल फ्युझलाज उत्पादन सुविधा आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला मोठा चालना मिळणार आहे.
हैदराबाद येथील या प्रकल्पात राफेल लढाऊ विमानाचे पुढचे भाग, मध्यभाग, मागचा भाग आणि साइड शेल्स यांचा समावेश असलेले संपूर्ण फ्युझलाज तयार केले जातील. वित्तीय वर्ष 2028 पासून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि दरमहा दोन पूर्ण फ्युझलाज तयार करण्याची क्षमता या केंद्राकडे असेल.
डसॉल्ट एव्हिएशनचे चेअरमन व सीईओ एरिक ट्रापियर म्हणाले, “भारतामध्ये आमची पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्याचा हा निर्णायक टप्पा आहे. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्ससारख्या स्थानिक भागीदारांमुळे आमच्या दर्जात्मक व स्पर्धात्मक गरजा पूर्ण होत आहेत.”
टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक सुकरण सिंग म्हणाले, “भारताच्या एअरोस्पेस क्षेत्राच्या प्रवासातील ही एक ऐतिहासिक घडी आहे. भारतात संपूर्ण राफेल फ्युझलाजची निर्मिती ही आमच्या कंपनींमधील विश्वासाचे द्योतक आहे आणि भारतात आधुनिक एअरोस्पेस उत्पादन क्षमता विकसित होत असल्याचे सिद्ध करते.”
राफेल हे ड्युअल इंजिन, मल्टी-रोल लढाऊ विमान असून त्याची लढाऊ कामगिरी जागतिक स्तरावर मान्य झाली आहे. 2016 मध्ये भारताने 36 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी सुमारे 7.87 अब्ज युरोंचा करार केला होता. ही विमाने सध्या भारताच्या पश्चिम व पूर्व सीमेवर तैनात आहेत.
या कराराअंतर्गत काही ‘ऑफसेट’ अटी होत्या, ज्या अंतर्गत डसॉल्टने भारतात गुंतवणूक करणे आवश्यक होते. हैदराबाद प्रकल्प ही त्याच अटींची सर्वात महत्त्वाची फलश्रुती मानली जात आहे.
याशिवाय, भारताने भारतीय नौदलासाठी 26 राफेल-मरीन (Rafale-M) विमाने खरेदी करण्यासाठी 63,000 कोटींचा करारही केला आहे. ही विमाने 2028 पर्यंत मिळणार असून 2030 पर्यंत त्यांचे वितरण पूर्ण होणार आहे.
या करारात शस्त्रे, प्रशिक्षण प्रणाली, सिम्युलेटर आणि दीर्घकालीन देखभाल सुविधांचा समावेश आहे.