

Mahua Moitra-Pinaki Mishra Marriage
नवी दिल्ली/बर्लिन (जर्मनी) : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अभ्यासू खासदार महुआ मोईत्रा या दुसऱ्यांदा बोहल्यावर चढल्या आहेत. बर्लिन येथे एका खासगी कार्यक्रमात त्यांनी संसदेतील जुने सहकारी आणि बिजू जनता दल (BJD) चे माजी खासदार पिनाकी मिसरा यांच्याशी पारंपरिक रितीने विवाह केला.
या दोघांचा लग्नाचा एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दोघेही राजकीय क्षेत्रातून असल्याने हे लग्न भारतीय राजकारणात चर्चेचा विषय ठऱत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये महुआ मोईत्रा पारंपरिक पोशाखात आणि भरजरी सोन्याच्या दागिन्यांमध्ये दिसून येतात, ज्यातून लग्न समारंभाचा साजशृंगार दिसून येतो. हा समारंभ अतिशय खाजगी ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये केवळ अत्यंत जवळचे कुटुंबीय आणि मित्र सहभागी झाले होते, असे कळते.
महुआ मोईत्रा यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1974 रोजी आसाममधील कछार जिल्ह्यातील लाबाक या गावी झाला. त्यांनी माउंट होलीओक कॉलेज, मॅसाच्युसेट्स, यूएसए येथून गणित आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क आणि लंडन येथील जेपी मॉर्गन चेस बँकेत इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले.
2009 मध्ये त्यांनी बँकिंग क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला. महुआ मोईत्रा यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राहुल गांधी यांच्या "आम आदमी का सिपाही" या मोहिमेत सक्रियपणे सहभागी झाल्या.
2010 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या करिंपूर मतदारसंघातून 2016 मध्ये निवडून आल्या. त्यानतंर 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्या पश्चिम बंगालमधील कृष्णानगर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
2010 मध्ये त्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. 2019 मध्ये पश्चिम बंगालमधील कृष्णानगर मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून आल्या आणि 2024 मध्ये पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.
त्यांचे संसदेतील “फॅसिझमची सात लक्षणं” हे भाषण देशभरात गाजले होते. त्यामुळे एक निर्भीड, स्पष्टवक्त्या नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात.
बिजू जनता दलाचे माजी खासदार असलेले पिनाकी मिसरा यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1959 रोजी ओडिशाच्या पुरी येथे झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहासात बीए ऑनर्स आणि नंतर कायद्यात पदवी घेतली.
सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेले पिनाकी मिसरा 1996 मध्ये पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. नंतर त्यांनी बीजेडीमध्ये प्रवेश केला आणि 2009, 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवले होते.
राजकारणाबरोबरच ते सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकीलही आहेत आणि अनेक संवेदनशील खटल्यांत त्यांनी कामगिरी बजावली आहे.
महुआ यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांनी यापूर्वी डॅनमार्कचे बँकर लार्स ब्रोर्सन (Lars Brorson) यांच्याशी लग्न केले होते. काही वर्षांनी दोघांमध्ये दूरावा निर्माण झाला आणि ते वेगळे झाले. त्यानंतर वकिल जय आनंद देहद्राय यांच्याशी महुआ तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होत्या, अशी चर्चा होती.
राजकीय क्षेत्रात नव्या नात्याची सुरुवात
खासदार महुआ मोईत्रा आणि पिनाकी मिसरा या दोघांची राजकीय पार्श्वभूमी भिन्न असली, तरी दोघांची ओळख विचारपूर्वक बोलणारे, अभ्यासू आणि प्रभावी वक्ते अशी आहे. खासगी लग्न समारंभानंतर दोघांनी अद्याप औपचारिक प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. त्यांच्या वैवाहिक नात्यामुळे देशाच्या राजकीय नकाशावर एक नवा अध्याय सुरू झाला आहे.