Rabies: गावाची झोप उडाली! पिसाळलेला कुत्रा म्हशीला चावला, अन् तिचंच दूध गावाने खाल्लं; रेबीजच्या भीतीने पुढे काय घडलं?
Rabies
बदायूं: एका अंत्यविधीच्या जेवणात वाढण्यात आलेले रायते चक्क रेबीज झालेल्या म्हशीच्या दुधापासून बनवले होते. म्हशीचा मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील पिपरौली या गावात मोठी खळबळ उडाली आहे. संसर्गाच्या भीतीने तब्बल २०० ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर रोजी एक अंत्यविधीचा कार्यक्रम झाला होता, ज्यामध्ये जेवणात रायते वाढण्यात आले होते. काही दिवसांनंतर असे समोर आले की, ज्या म्हशीचे दूध वापरले होते, तिला पिसाळलेलं कुत्र चावलं होत. २६ डिसेंबर रोजी त्या म्हशीचा मृत्यू झाला, ज्यामुळे संसर्गाच्या भीतीने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी उझानी येथील आरोग्य केंद्रात धाव घेऊन लसीकरण करून घेतले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर मिश्रा यांनी रविवारी सांगितले की, "त्या म्हशीला एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता आणि मृत्यूपूर्वी तिच्यामध्ये रेबीजची लक्षणे दिसून आली होती. ग्रामस्थांनी तिच्याच दुधापासून बनवलेले रायते खाल्ल्याचेही समोर आले. ज्या कोणाला शंका होती, त्या प्रत्येकाला रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. दूध उकळल्यानंतर रेबीजचा धोका राहत नाही, परंतु कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी हे लसीकरण करण्यात आले आहे."
मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, उझानी आरोग्य केंद्रात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्वरित लस देण्यात आली. यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्र सुरू ठेवण्यात आले होते. तसेच अफवा किंवा भीती पसरू नये म्हणून गावावर लक्ष ठेवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
धर्मपाल नावाच्या एका ग्रामस्थाने सांगितले की, "म्हशीला कुत्रा चावला होता, ज्यामुळे ती आजारी पडली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. त्याच म्हशीच्या दुधापासून रायते बनवल्यामुळे संसर्गाची भीती निर्माण झाली, म्हणून आम्ही रेबीजचे इंजेक्शन टोचून घेतले."

