

Supreme Court : शेजाऱ्यासोबत झालेला वाद किंवा मारहाणीचा प्रकार घडला असला तरी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अंतर्गत जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने अपीलकर्ता महिलेची निर्दोष मुक्तता केली.
सारिका आणि गीता या दोन महिला शेजारी राहत होत्या. सारिका ही अविवाहित होती. याच मुद्द्यावरून गीता तिची वारंवार थट्टा करत असे. १२ ऑगस्ट २००८ रोजी सारिकाने रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात ती गंभीर जखमी झाली. उपचार सुरू असताना २ सप्टेंबर २००८ रोजी तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी रुग्णालयात दिलेल्या जबाबात सारिकाने आरोप केला होता की, गीता तिला वारंवार अविवाहित असल्यावरून हिणवत असे आणि अपमान करत असे. १२ ऑगस्ट २००८ रोजी संध्याकाळी गीता व इतरांनी तिच्या कुटुंबासोबत गैरवर्तन करून मारहाण केली. सारिकाने दिलेल्या जबाबावरून चौघांवर गुन्हा दाखल झाला. कनिष्ठ न्यायालयाने चार सहआरोपींना निर्दोष सोडले; परंतु गीताचे वर्तन चिथावणी देण्यासारखे होते, असे स्पष्ट करत तिला दोषी ठरवले होते. या विरोधात तिने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली.
गीताचे वर्तन हे सारिकाने जीवन संपविण्यासाठी चिथावणी देण्यासारखे होते, या मताला कर्नाटक उच्च न्यायालयाने अंशतः पुष्टी दिली. सारिका ही एक संवेदनशील व्यक्ती होती जिने सतत छळ सहन केल्यानंतर हे टोकाचे पाऊल उचलले, असे स्पष्ट करत गीताला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.
उच्च न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला गीताने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तिच्या याचिकेवर न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, शेजाऱ्यांबरोबरची भांडणे दुर्दैवी आहेत; परंतु समूह म्हणून जीवन जगताना ती एक सामान्य बाब आहे. तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा, ही आदर्श परिस्थिती असली तरी, शेजाऱ्यांसोबत भांडणे सामाजिक जीवनातील सर्वसामान्य घटना आहे. प्रश्न असा आहे की, जीवन संपविण्यास प्रवृत्त करण्याचा खटला तथ्यांवरून घडला आहे का? या प्रकरणी सादर करण्यात आलेल्या पुराव्यांमधून हा प्रकार जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त करण्यात आला हे सिद्ध झालेले नाही.
या प्रकरणी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कुमार विरुद्ध छत्तीसगड राज्य या खटल्यातील निकालाचा दाखला देताना म्हटलं की, "एखाद्याला चिथावणी देणे, परिणाम काय होतील याचा विचार न करता रागाच्या भरात किंवा भावनेच्या भरात उच्चारलेला शब्द हे जीवन संपविण्यासाठी प्रेरित करणारे ठरले असे म्हणता येणार नाही. शेजाऱ्यांबरोबर भांडणे दैनंदिन जीवनात होतात. या प्रकरणातील तथ्यांवरून आपण असा निष्कर्ष काढू शकत नाही की, अशा भांडणामुळे जीवन संपविण्यास प्रवृत्त केले गेले. अपीलकर्त्याकडून इतक्या प्रमाणात चिथावणी देण्यात आली होती की, पीडितेला जीवन संपविण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही," असे स्पष्ट करत न्यायालयाने गीताची निर्दोष मुक्तता केली.