

Punjab Drug Crisis Mother Loses Sixth Son: लुधियाना जिल्ह्यातील शेरवाल गावात राहणाऱ्या शिंदर कौर या महिलेने ड्रग्जमुळे सहा मुलांना गमावल्याचा दावा केला आहे. तिचा शेवटचा आणि सर्वात धाकटा मुलगा देखील मृतावस्थेत सापडल्यानंतर, आता त्यांनी सरकारकडे मदतीची आणि कडक कारवाईची मागणी केली आहे.
शिंदर कौर यांचा 20 वर्षांचा मुलगा जसवीर सिंह याचा मृतदेह सिधवां बेट परिसरातील एका कालव्याच्या जवळ सापडला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जसवीर हा 14 जानेवारी रोजी गावातील गुरुद्वारात स्वयंसेवा करण्यासाठी घरातून गेला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. नातेवाईकांनी शोध घेतला असता कालव्याजवळ त्याचा मृतदेह दिसून आला आणि कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेनंतर शिंदर कौर यांनी सांगितलं की, पंजाबमध्ये पसरलेल्या ‘चिट्टा’ या सिंथेटिक हेरॉईनमुळे त्यांच्या घरातील सर्व मुलांचा मृत्यू झाला. त्यांचं म्हणणं आहे की, “चिट्टा थांबत नाही. ड्रग्ज विकणारे पकडले जातात, पण काही दिवसांत ते पुन्हा सुटून बाहेर येतात. आम्हाला हे थांबवायचं आहे, जेणेकरून इतर कुटुंबांना हा त्रास सहन करावा लागणार नाही.”
शिंदर कौर यांच्या आयुष्यातील दुःखाची मालिका 2012 पासून सुरू झाली. त्यांचे पती मुख्तियार सिंह यांचा 2012 मध्ये वाहन अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर पुढील 13 वर्षांत शिंदर कौर यांनी सहाही मुलांचे अंत्यसंस्कार केले, असा दावा त्यांनी केला आहे.
कुटुंबीयांनी सांगितलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या मुलांची नावे अशी आहेत—
कुलवंत सिंह (34 ) – 2013
गुरदीप सिंह – मार्च 2021
जसवंत सिंह – जुलै 2021
राजू सिंह – नोव्हेंबर 2022
बलजीत सिंह – मार्च 2023
जसवीर सिंह (20) – जानेवारी 2026
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जसवीरसोबत घटनेच्या दिवशी एक व्यक्ती होती. ती व्यक्ती आता पोलिसांच्या ताब्यात असून, दोघांनीही ड्रग्ज इंजेक्शनद्वारे घेतलं होतं. त्यानंतर जसवीर अचानक बेशुद्ध पडला आणि मृत्यू झाला. घाबरून एक व्यक्ती तिथून पळून गेल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली. स्थानिक नागरिकांनी ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन केलं. पंजाबमधील अनेक भागांत ड्रग्जचं वाढतं जाळं आणि ‘चिट्टा’ची दहशत ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.