

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पणजी विभागीय कार्यालयामार्फत आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ तस्करी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सुमारे ३ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने एनडीपीएस कायद्यांतर्गत नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने ईसीआयआर दाखल केली होती.
त्यानंतर गोवा, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा आणि दिल्ली अशा ७ राज्यांमधील एकूण २६ ठिकाणी एकाच वेळी झडती कारवाई करण्यात आली. या झडतीदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे तसेच सुमारे ३ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात हा एक सुसंघटित आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीचा सिंडिकेट असल्याचे उघड झाले आहे.
हे रॅकेट मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा पुरवठा करत होते. त्यातून मिळालेल्या अवैध पैशांचे बँक ट्रान्सफर, यूपीआय, क्रिप्टोकरन्सी तसेच रोख व्यवहारांद्वारे मनी लॉन्डरिंग केले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ईडीने मधुपन एस. एस. याला मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक केली असून, गोव्यातील विशेष न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सर्व लाभार्थी, सूत्रधार आणि सहाय्यकांची ओळख पटवणे तसेच बेकायदेशीर व्यवहारांतून निर्माण झालेल्या मालमत्तेचा शोध घेणे यासाठी पुढील तपास सुरू आहे.