

Insta Queen police constable Punjab Amandeep Kaur arrest Disproportionate assets case
बठिंडा (पंजाब) : इंस्टाग्रामवर तिच्या लक्झरी लाईफस्टाइलमुळे ‘इंस्टा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली आणि आता गुन्हेगारी चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेली पंजाब पोलिसातील निलंबित अंमलदार अमनदीप कौर हिला अटक करण्यात आली आहे.
पंजाब व्हिजिलन्स ब्युरोने तिच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याप्रकरणी ही कारवाई केली. तिच्या एकूण 1.35 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर ताबा ठेवण्यात आला आहे.
बठिंड्याच्या चक फतेहसिंह वाला गावची रहिवासी असलेली कॉन्स्टेबल अमनदीप कौर ही पोलिस खात्यात कार्यरत असताना सतत इंस्टाग्रामवर तिच्या महागड्या गाड्या, ब्रँडेड घड्याळे, सोन्याचे दागिने आणि इतर लक्झरी वस्तूंचे व्हिडिओ पोस्ट करत होती. त्यामुळेच तिला ‘इंस्टा क्वीन’ म्हणून ओळख मिळाली.
एप्रिल 2025 मध्ये अमनदीप कौर हिला अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सने 17.71 ग्रॅम हेरॉईनसह पकडले होते. या प्रकरणी तिच्यावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता . तिचे निलंबन करण्यात आले आणि नंतर 2 मे रोजी तिला जामीनही मिळाला.
आता व्हिजिलन्स ब्युरोच्या चौकशीनंतर तिच्या नावावर असलेली करोडो रुपयांची संपत्ती तिच्या अधिकृत उत्पन्नाशी जुळत नसल्याचं उघड झालं आहे.
विराट ग्रीन, बठिंडा येथील 217 स्क्वे. यार्ड भूखंड ---- ₹99,00,000
ड्रीम सिटी, बठिंडा येथील 120.83 स्क्वे. यार्ड भूखंड -------- ₹18,12,000
महिंद्रा थार ------------ ₹14,00,000
रॉयल एनफिल्ड बुलेट ------------ ₹1,70,000
रोलेक्स घड्याळ ------------ ₹1,00,000
आयफोन 13 प्रो मॅक्स ------------ ₹45,000
आयफोन एसई ------------ ₹9,000
व्हिवो मोबाईल ------------ ₹2,000
एसबीआय बँक बॅलन्स ------------ ₹1,01,588.53
एकूण मूल्य ------------ ₹1,35,39,588.53
तिच्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओंचाही तपास केला जात आहे. महागड्या हँडबॅग्स, घड्याळे आणि सोन्याच्या दागिन्यांनी परिपूर्ण असलेल्या रील्समध्ये दिसणाऱ्या जीवनशैलीमुळे तिच्याविषयी संशय आल्याने तिची चौकशी करण्यात आली.
या प्रकरणामुळे पोलीस खात्यातील अंतर्गत नियंत्रण, जबाबदारी आणि भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जे अधिकारी कायदा पाळण्याची शपथ घेतात, त्यांच्याकडून अशा प्रकारचा गैरवर्तन केल्यास कायदाच प्रश्नांकित होतो.