

Kamal Haasan DMK deal Tamil Nadu Rajya Sabha elections 2025
चेन्नई / नवी दिल्ली : अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम (MNM) पक्षाचे प्रमुख कमल हसन लवकरच राज्यसभेत प्रवेश करणार आहेत. तमिळनाडूमधील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षासोबत झालेल्या निवडणूकपूर्व करारानंतर त्यांना राज्यसभा जागेसाठी उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
राज्यसभेच्या 8 जागांसाठी 19 जून रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये तमिळनाडूतील 6 आणि आसाममधील 2 जागांचा समावेश आहे.
कमल हासन यांच्या MNM पक्षाने 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी DMK आघाडीत अधिकृतरित्या प्रवेश केला होता. त्यानंतर DMK ने त्यांना दोन पर्याय दिले होते. एकतर लोकसभा निवडणूक लढवणे किंवा निवडणुकीनंतर राज्यसभेवर जाणे.
कमल हासन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यापेक्षा राज्यसभा सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी नसून राष्ट्रीय हितासाठी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कमल हासन यांनी 2018 मध्ये मक्कल निधी मय्यम हा राजकीय पक्ष स्थापन केला. त्या वेळी त्यांनी द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन प्रमुख द्राविड पक्षांना पर्याय देण्यासाठीच ही चळवळ सुरू केली होती.
मात्र, 2024 पूर्वी त्यांनी आपली भूमिका बदलत द्रमुक आघाडीत प्रवेश केला आणि काँग्रेससह आघाडीच्या उमेदवारांना पूर्ण पाठिंबा दिला.
यावर्षी MNM च्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त कमल हसन यांनी संसदेत प्रवेशाबाबत संकेत दिला होता. त्यांनी म्हटले होते की, “या वर्षी आपला आवाज संसदेत ऐकू येईल. पुढच्या वर्षी तुमचा आवाज विधानसभेत घुमेल.” त्यांची ही घोषणा आता वास्तवात उतरत आहे.
सद्यस्थितीत तमिळनाडू विधानसभेत द्रमुककडे 134 आमदार आहेत, त्यामुळे राज्यसभेच्या 6 पैकी 4 जागा DMK ला सहज मिळू शकतात.
उरलेल्या 2 जागा AIADMK कडे जाण्याची शक्यता आहे. AIADMK ने पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी केली आहे.
राज्यसभेतील तमिळनाडूच्या सध्याच्या 6 खासदारांचा कार्यकाळ 25 जुलै 2025 रोजी संपत आहे. यामध्ये अंबुमणि रामदास, एम. शन्मुगम, एन. चंद्रशेखरन, एम. मोहम्मद अब्दुल्ला, पी. विल्सन आणि वायको यांचा समावेश आहे.
2026 मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे तामिळनाडूचे राजकारण पेटणार आहे. कमल हासन यांचा राज्यसभा प्रवेशदेखील विधानसभा निवडणुकीसाठीची तडजोड आहे.
द्रमुक आघाडी- सत्ताधारी द्रमुकचे नेते मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे नेतृत्व मजबूत आणि स्थिर मानले जात आहे. पारंपरिक मतदार आणि कल्याणकारी योजनांवर भर हे त्यांचे जमेचे मुद्दे आहेत. द्रमुक आघाडीमध्ये काँग्रेस, वि. स. कम्युनिस्ट पक्ष, MDMK, कमल हासन यांचा MNM हे पक्ष आहेत.
अण्णा द्रमुक आघाडी- द्रमुकचा पारंपरिक विरोधक अण्णा द्रमुकचे नेतृत्व एडप्पडी के. पलानीस्वामी करत आहेत. त्यांच्यासोबत भाजप, पीएमके हे पक्ष येऊ शकतात. पण, अंतर्गत गटबाजी, नेतृत्वावरून वाद, नवमतदारांमध्ये कमी असलेले अपील या बाजू त्यांच्या विरोधात जाऊ शकतात.
भाजप- तामिळनाडूमध्ये विस्ताराचा प्रयत्न करत आहे. पण पक्षाचा स्थानिक प्रभाव मर्यादित आहे. तथापि, काही महिन्यांपुर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूत येऊन द्रमुकचा सुपडासाफ करणार असे चॅलेंज दिले होते.
थलपती विजयचा पक्ष टीव्हीके
दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार थलपती विजय याचा तमिऴगा वेट्री कळगम (TVK) हा पक्ष चर्चेत आहे. विजयने 2026 च्या विधानसभेसाठी थेट मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.