

Kanpur parking dispute
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका उच्चभ्रू इमारतीतील निवासी परिसरात पार्किंग जागेवरुन झालेल्या वादातून एक भयंकर प्रकरण समोर आले आहे.
पार्किंगवरून वाद झाल्यानंतर संतापलेल्या एका फ्लॅट मालकाने चक्क सोसायटीच्या सचिवाचे नाक चावून तोडले आहे. हा भयंकर प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे प्रकार कानपूरच्या नरमऊ भागातील ‘रतन प्लॅनेट अपार्टमेंट’मध्ये घडले. निवृत्त अभियंता आणि सोसायटीचे सध्याचे सचिव रुपेंद्र सिंह यादव याच्यावर हा हल्ला झाला आहे.
रुपेंद्र यांची मुलगी प्रियांका हिने सांगितले की, ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. अपार्टमेंटमधीलच रहिवासी क्षितिज मिश्रा यांनी त्यांच्या पार्किंग जागेत इतर कोणीतरी गाडी लावल्याची तक्रार केली.
दिवसभरात क्षितिज मिश्रा यांनी रुपेंद्र सिंह यादव यांना फोन करून ही तक्रार केली. यावर रुपेंद्र यांनी सुरक्षा रक्षकाला पाठवण्याचा सल्ला दिला, मात्र क्षितिज यांनी यादव यांना स्वतःच खाली येण्याची सक्ती केली.
रुपेंद्र सिंह यादव जेव्हा पार्किंग परिसरात आले, तेव्हा अचानक वाद वाढला. परिस्थिती चिघळली आणि क्षितिज मिश्रा यांनी यादव यांच्यावर हल्ला करत त्यांना थप्पड मारली, त्यानंतर त्यांच्या मानेला पकडून नाक चावून तोडले, असा आरोप आहे. यामुळे रुपेंद्र यांचा चेहरा रक्ताने माखला.
घाबरलेल्या रुपेंद्र यांच्या मुलांनी त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात नेले. त्यानंतर रुपेंद्र सिंह यादव यांचे पुत्र प्रशांत यांनी यांनी भितूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून क्षितिज मिश्रा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
कल्याणपूरचे एसीपी अभिषेक पांडे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पीडित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये क्षितिज मिश्रा हे सचिवाला थप्पड मारताना आणि त्यांच्या मानेला पकडून नाक चावताना दिसत आहेत. नाक चावताच सचिव वेदनेने ओरडताना आणि घराकडे धावताना दिसतात.
ही घटना सामाजिक सहिष्णुतेच्या दृष्टीने गंभीर असून, अशा प्रकारच्या वादांना तोंड देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.