

India and Pakistan tensions : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातही दिसून आला. दोन्ही देशांमधील तणावामुळे हायकोर्ट बार असोसिएशनने (नो वर्क डे) काम थांबवण्याचा निर्णय घेतला. यावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू यांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला करत वकिलांना खडेबोल सुनावले.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालाच्या वकिलांनी युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता शुक्रवारी (दि.९ मे) "नो वर्क डे" पाळण्याचा निर्णय घेतला होता. तसेच न्यायालयाने कोणतेही प्रतिकूल आदेश देऊ नयेत, अशी विनंती केली. होती. अनेक वकील न्यायालयात गैरहजर होते. वकिलांच्या अनुपस्थितीमुळे उच्च न्यायालयात बहुतेक खटले तहकूब करावे लागले.काम बंद करण्याच्या निर्णयावर आणि सुनावणी तहकूब करण्याची मागणीवर मुख्य न्यायाधीश शील नागू यांनी नाराजी व्यक्त केली.
शुक्रवारी पंजाब आणि हरियाणामधील पाणीवाटपाच्या वादावर मुख्य न्यायाधीश नागू आणि न्यायमूर्ती सुमित गोयल यांच्या खंडपीठाने सुनावणी सुरू केली. यावेळी मुख्य न्यायाधीश शील नागू म्हणाले की, मी बार असोसिएशनच्या अध्यक्षांशी बोलून नो वर्क डेबाबत चिंता व्यक्त केली. आपले सैनिक लढत आहेत, तेव्हा तुम्ही घरी बसून आराम करणार? हे फारच दुर्दैवी आहे." भारतीय सैन्य युद्ध लढत आहे; पण तुम्हाला घरी बसून आराम करायचा आहे. दोन्ही देशांमधील तणावानंतर आपल्याला काम करावे लागेल अन्यथा देशाची व्यवस्था ठप्प होऊ शकते. यावेळी बार असोसिएशनने स्थगितीचा हवाला देत खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. मुख्य न्यायाधीशांनी खडेबोल सुनावल्यानंतर पंजाब आणि हरियाणा बार कौन्सिलनेही काम न करण्याचे आवाहन केले. आपल्याकडे एक व्यासपीठ आहे. घरी बसूनही प्रत्येकजण एकमेकांशी जोडलेले राहू शकतो, असेही मुख्य न्यायाधीश शील नागू यांनी नमूद केले.