

बंगळूर : विचित्र चोरीप्रकरणी बंगळूर बसवनगुडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी एका प्राध्यापिकेला अटक केली आहे. ऐकावे ते नवलच...याप्रमाणे सदर प्राध्यापिका आठवडाभर अध्यापन करायची व रविवारची चोरी करायची. रेवती असे त्या प्राध्यापिकेचे नाव असून, ती मूळची शिमोगा येथील आहे. पोलिसांनी तिच्याकडून सुमारे 32 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर प्राध्यापिका बंगळूरमधील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात कन्नड विषय शिकवते. ती आठवडाभर अध्यापन करायची आणि रविवारी चोऱ्या करत होती. बंगळूर शहरातील कल्याण केंद्रांमध्ये दागिने चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. याबाबत अनेक तक्रारीदेखील पोलिसांत दाखल झाल्या आहेत. त्याप्रमाणे 25 नोव्हेंबर रोजी बसवनगुडी येथील द्वारकानाथ कल्याण केंद्रात चोरीची घटना घडली. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कल्याण केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता सदर प्राध्यापिका चोर असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिला अटक करून चौकशी केली असता तिचे पितळ उघडे पडले.
सदर महिला आठवडाभर कॉलेजमध्ये कन्नड प्रोफेसर म्हणून शिकवत असायची. रविवारी ती रेशमी साडी घालून लग्नाच्या हॉलमध्ये जायची. तिथे ती वधू किंवा वराच्या नातेवाईकांसारखी वागत असे. त्यानंतर वधू, वर किंवा त्यांच्या नातेवाईकांचे दागिने चोरून क्षणार्धात गायब व्हायची. सुंदर व्यक्तिमत्त्व व आकर्षक पोशाख परिधान करून ती सभागृहात विनम्रतेने वागायची. त्यामुळे तिच्या वागण्याचा कोणालाही संशय येत नव्हता. अखेर बसवनगुडी येथील द्वारकानाथ कल्याण मंडपातून चोरी करताना तिला पकडण्यात आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.