

सांगली : ऑनलाईन गंडा घालण्यासाठी, तसेच हवालाच्या रकमेची देवाण-घेवाण करण्यासाठी बँक खात्यांचा वापर करून गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सांगली सायबर पोलिसांना यश आले. याप्रकरणी जैब जादेव शेख (वय 22, रा. मीरा हौसिंग सोसायटी, टिंबर एरिया, सांगली) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कमिशन बेसवर चालविल्या जाणाऱ्या 34 बँक खात्यांची कागदपत्रे व मोटार, असा 11 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ऑनलाईन गंडा घालण्यासाठी, तसेच हवालाची रक्कम कमिशन बेसवर काढून देण्याचे रॅकेट जैब शेख हा सांगलीतून चालवित होता. त्यासाठी त्याने काहीजणांना कमिशन देऊन त्यांचे अधिकृतरीत्या बँक खाते उघडले होते. या खात्यावरून तो कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करीत होता. याची माहिती सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय हारूगडे यांना मिळाली. त्यानुसार तपास सुरू होता. सायबर पोलिसांनी संशयास्पद बँक खात्यांची तपासणी केली असता, एकाकडून 34 खाती चालविली जात असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार जैब शेख याच्या घरावर छापा टाकून त्यास अटक करण्यात आली.
चौकशीदरम्यान त्याच्याकडून काही खातेदारांचे ‘म्युल’ खाते चालविले जात असल्याचे समोर आले. त्याच्याकडून 34 बँक खात्यांचे डेबीट कार्ड, धनादेश, पासबुक जप्त करण्यात आले. ऑनलाईन गंडा घालण्यासाठी त्याने तब्बल 27 सीमकार्डचा वापर केल्याचे समोर आले. हा सर्व मुद्देमाल त्याकडून जप्त करण्यात आला आहे. त्याने ज्या 34 जणांचे बँक खाते कमिशन बेसवर वापरले, त्या सर्वांची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. तसेच त्याने या बँक खात्यांवरून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे. यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, सहायक निरीक्षक रूपाली बोबडे, हवालदार करण परदेशी, रेखा कोळी, रूपाली पवार, सलमा इनामदार, विवेक साळुंखे, अजय कोळी, अभिजित पाटील, विजय पाटणकर, अजय बेंदरे, इम्रान महालकरी, दीपाली नेटके, शांतव्वा कोळी, गणेश नरळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.