

Kej youth crime
केज : केज तालुक्यातील एका गावात प्रेमसंबंध तुटल्यानंतरही एका तरुणीने माजी मित्राच्या घरात घुसून गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ढाकेफळ (ता. केज) येथील एक तरुण लातूर येथे शासकीय सेवेत कार्यरत आहे. त्याचे आणि त्याच गावातील एका तरुणीचे पूर्वी मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, नातेवाईकांच्या मध्यस्थीने दोघांमधील संबंध संपुष्टात आल्याचे नोटरीमार्फत शपथपत्र करून घेतले गेले होते.
दि. १४ डिसेंबर रोजी त्या तरुणाच्या लहान भावाच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असताना सदर तरुणी अचानक घरात आली व गोंधळ घातला. उपस्थितांनी तिला समजावून सांगितल्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांमधील संबंध पूर्णतः संपल्याचे लेखी शपथपत्र तयार करण्यात आले.
मात्र, दि. २२ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता ती तरुणी पुन्हा संबंधित तरुणाच्या घरात घुसली व दरवाजावर थुंकल्याचा आरोप आहे. यावेळी तरुणाच्या वडिलांनी जाब विचारला असता तिने शिवीगाळ करत घर सोडणार नसल्याची धमकी दिली. तसेच गंभीर परिणामांची भाषा करत ती घटनास्थळावरून निघून गेली.
या घटनेनंतर तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३२१/२०२५ अन्वये भा.न्या.सं. कलम ३५१(२), ३५२, ३३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल केशव खाडे करीत आहेत.
दोघांमधील मैत्री संपुष्टात आल्याचे शपथपत्र नातेवाईकांच्या दबावातून घेतले गेले असावे, अशी चर्चा आहे. भविष्यात या प्रकरणातून काही अनुचित घटना घडल्यास नोटरी व साक्षीदारांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.