नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभेसाठी काँग्रेसने प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी जम्मू-काश्मीरमधील प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. तर राहुल गांधी यांचे लक्ष हरियाणावर असेल. तसेच राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्येही प्रचार करणार आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रियांका गांधी जम्मू-काश्मीरमधून प्रचाराची सुरुवात करतील. तर राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर प्रचार सुरु करतील. राहुल गांधी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
प्रियांका गांधी ८ सप्टेंबरपासून जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक प्रचार सुरू करणार आहेत. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये त्या अर्धा डझनहून अधिक रोड शो करतील. हरियाणामध्ये प्रियंका गांधींच्या १४ ते १६ प्रचारसभा आयोजित केल्या जाऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत हरियाणात ज्या प्रकारे काँग्रेसने १० पैकी ५ जागा जिंकल्या आहेत. तेव्हापासून हरियाणात काँग्रेसच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हरियाणा निवडणूक प्रचारात जास्त वेळ घालवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राहुल गांधी ५ सप्टेंबरला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करणार आहेत. राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यादरम्यान प्रियांका गांधी जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. त्या दोन्ही राज्यांतील निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.