

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उद्या सोमवारी (दि. 19) शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.
या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी त्यांना हजर होण्याचे आदेश दिले होते. राहुल गांधी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात गांधी यांनी सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले होते. या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजाविण्यात आली होती.
अखेर पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी 19 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात वंशज सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या खटल्यात राहुल गांधी यांना 19 ऑगस्ट रोजी न्यायालयात समक्ष उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी न्यायालयाच्या समक्ष उपस्थित राहतात की नाही, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
- अॅड. संग्राम कोल्हटकर, सात्यकी सावरकर यांचे वकील