पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करत या प्रकरणातील पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर प्रश्न निर्माण करतो, अशी प्रतिक्रिया लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. X वरील पोस्टमध्ये त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या भीषण घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. तिच्यावरील क्रूर आणि अमानुष कृत्याचे पदर ज्याप्रकारे समोर येत आहेत, त्यावरून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर समुदाय आणि महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे."
पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर प्रश्न निर्माण करतो. हाथरस ते उन्नाव आणि कठुआपासून कोलकातापर्यंत महिलांवरील सातत्याने वाढत असलेल्या अत्याचारांच्या घटनांवर प्रत्येक पक्ष आणि समाजातील घटकांना गंभीर चर्चा करावी लागेल, ठोस पावले उचलावी लागतील, असे आवाहनही त्यांनी आपल्या पोस्टमधून केले आहे.
या घटनेने विचार करायला भाग पाडले आहे की जर वैद्यकीय महाविद्यालयासारख्या ठिकाणी डॉक्टरच सुरक्षित नसतील, तर पालक आपल्या मुलींना बाहेर अभ्यासासाठी कसे पाठवतील? निर्भया प्रकरणानंतरचे कडक कायदेही असे गुन्हे रोखण्यात का अपयशी ठरले आहेत?, असा सवालही त्यांनी केला आहे.