Prithviraj Chavan : शरद पवारांचे ५-६ खासदार अस्वस्थ! पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; ‘मिसिंग लिंक’ला विरोध नसल्‍याचे स्‍पष्‍टीकरण

Prithviraj Chavan : शरद पवारांचे ५-६ खासदार अस्वस्थ! पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; ‘मिसिंग लिंक’ला विरोध नसल्‍याचे स्‍पष्‍टीकरण
Published on
Updated on

नवी दिल्ली : शरद पवार यांच्‍या नेतृत्‍वाखालील राष्‍ट्रवादी काँग्रेसची भारतीय जनता पक्षाशी जवळीक वाढल्‍याच्‍या चर्चा सुरू असतानाच, आता माजी मुख्‍यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी शरद पवार यांच्‍या पक्षाचे ५ ते ६ खासदार अस्‍वस्‍थ असल्‍याचे वक्‍तव्‍य करून खळबळ उडवून दिली आहे.

दिल्‍लीत पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना चव्हाण म्हणाले, सत्ताधारी भाजपला विरोधी पक्ष ठेवायचा नाही. २०२९ च्या निवडणुकीत दोनतृतीयांश बहुमत मिळविण्याची रणनीती भाजप आखत आहे. आता शरद पवारांच्या पक्षाचे ५-६ खासदार अस्वस्थ असल्याचे समजते. यावर अधिक बोलण्‍यास मात्र चव्‍हाण यांनी नकार दिला. शरद पवार ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही. मात्र, शरद पवार भाजपमध्ये जातील, असे वाटत नसल्याचे चव्‍हाण म्‍हणाले.

शरद पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट टाळता आली असती. यासंदर्भात ‘उबाठा’चे खा. संजय राऊत यांची प्रतिक्रिया शिवसेना पक्ष म्हणून स्वाभाविक असल्याचेही ते म्‍हणाले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ हा प्रकल्प काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्याच काळातील संकल्पना आहे. आम्हीच या प्रकल्पावर काम सुरू केले. त्यामुळे आम्ही स्थगित करण्याचा प्रश्नच नव्हता, असे चव्हाण म्‍हणाले. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाबाबत सरकारकडून होणार्‍या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते.

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची किंमत वाढीमागे अनेक कारणे असू शकतात. कथित कमिशनखोरीचाही त्यात वाटा असू शकतो. काँग्रेसचे सरकार आल्यास या प्रकल्पाचे कॉस्ट ऑडिट केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. प्रकल्‍प पूर्ण केल्‍याबद्दल देवेंद्र फडणवीस सरकारचे अभिनंदन करताना चव्‍हाण यांनी ‘मिसिंग लिंक’वरील घटनेसाठी अतिवृष्टी कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण हास्यास्पद असल्याची टीका केली.

‘त्या’ नगरसेवकाचे वर्तन हा महाराष्ट्राचा अवमान

विरोधकांचा आक्षेप राज्यावर नाही, तर सरकारच्या भूमिकेवर आहे. विरोधकांनी आक्षेप घेणे ही नव्‍हे, तर एक नगरसेवक डॉक्टरला मारहाण करतो, ही राज्याची बदनामी आहे, असे चव्‍हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या विधानसभेतील वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news