पुढारी ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) बुधवारी पोलंड दौऱ्यासाठी (PM Modi Poland Visit) रवाना झाले. या दौऱ्यात ते द्विपक्षीय संबंधांना अधिक चालना देण्यासाठी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांच्याशी चर्चा करतील. ४५ वर्षातील भारतीय पंतप्रधानांचा पोलंडचा हा पहिलाचा दौरा आहे.
भारत आणि पोलंड यांच्यातील राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा होत आहे. त्यांच्या प्रस्थानाच्या निवेदनात पंतप्रधानांनी पोलंडचा मध्य युरोपमधील प्रमुख आर्थिक भागीदार म्हणून उल्लेख केला आहे. ते तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
"आमच्या राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत असताना मी पोलंडला भेट देत आहे. पोलंड हा मध्य युरोपमधील प्रमुख आर्थिक भागीदार आहे. लोकशाही आणि बहुतत्ववादासाठी आमची परस्पर बांधिलकी आमच्या नातेसंबंधांना आणखी मजबूत करते," असे ते म्हणाले.
"मी आमचे मित्र पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांना भेटून द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी उत्सुक आहे. मी पोलंडमधील भारतीय समुदायाशीदेखील संवाद साधणार आहे," असे त्यांनी पुढे नमूद केले.
पंतप्रधान मोदी २३ ऑगस्ट रोजी पोलंडमधून युक्रेनला लक्झरी 'ट्रेन फोर्स वन'ने प्रवास करतील. ज्यातून याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन सारख्या जागतिक नेत्यांनी प्रवास केला आहे. पंतप्रधान मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील. पंतप्रधान मोदी यांचा युक्रेनचा हा पहिलाच दौरा असेल आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरची ही त्यांची पहिली भेट असेल. युक्रेन आमचा मित्र आणि भागीदार असून येथे लवकरच शांतता आणि स्थिरता प्रस्थापित होईल, अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.
"मी पोलंडमधून राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून युक्रेनला भेट देणार आहे. भारतीय पंतप्रधानांचा युक्रेनचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या याआधीच्या चर्चांना पुढे नेण्यासाठी आणि सध्या सुरू असलेल्या युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी दृष्टीकोन शेअर करण्याच्या संधीची मला प्रतीक्षा आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.