

Putin India Visit
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आज (दि. ४ डिसेंबर) सायंकाळी दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पालम विमानतळावर स्वागत केले.यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन दिले.
दिल्लीत दाखल झाल्यावर लगेचच, पंतप्रधान मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकाच गाडीतून विमानतळावरून रवाना झाले. पालम विमानतळावरून निघाल्यानंतर काही मिनिटांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन दिल्लीतील ७, लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचले.
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा होणार आहे.यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन हे पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित रात्रीच्या भोजनात सहभागी होतील.ही भेट केवळ राजकीय औपचारिकता नसून, बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत-रशिया संबंधांच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात मानली जात आहे.
पुतिन यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 5 डिसेंबर रोजी, रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर बैठकीत सहभागी होतील.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन म्हणाले की, भारत आणि रशियामध्ये सहकार्याच्या अनेक संधी आहेत. विशेषतः तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन मूल्य साखळी विकसित करणे. दोन्ही देश आधीच या क्षेत्रांमध्ये नियमित संवाद साधत आहेत आणि संबंधित चर्चेसाठी भारतीय मंत्री जूनमध्ये रशियाला भेट देऊन आले होते. भारत आपल्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, तर सॉफ्टवेअर हा देशाचा सर्वात मोठा निर्यात क्षेत्र आहे.