President Election 2022 : द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीने आम आदमी पार्टी संभ्रमात

President Election 2022 : द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीने आम आदमी पार्टी संभ्रमात

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती निवडणुकीसाठी (President Election 2022) एनडीएने आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवार बनवले आहे. तर, विरोधकांनी भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही आघाड्यांनी त्यांचे उमेदवार निश्चित केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांनी आपआपल्या संख्याबळाची चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीत दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षाची भूमिका महत्त्‍वाची राहणार आहे. पंरतु, पक्षाने अद्यापही कुठल्या आघाडीच्या उमेदवाराला समर्थन द्यायचे, हे निश्चित केलेले नाही.

पंजाब विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नरत आहेत. पक्षाकडून भाजपच्या विरोधात काँग्रेस ऐवजी आम आदमी पक्षच प्रबळ पर्याय असल्याचे 'प्रोजेक्ट' केले जात आहे. अशात आप कडून विरोधकांच्या उमेदवाराचे समर्थन केले जाईल, असे बोलले जात आहे. पंरतु, भाजपने आदिवासी कार्ड खेळल्यानंतर आप विचार करण्यास बाध्य झाली आहे. गेल्या काही काळापासून केजरीवाल स्वत:ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून प्रोजेक्ट करीत आहेत. अशात द्रौपदी मुर्मु यांच्या उमेदवारीपासून (President Election 2022) फारकत घेणे आप साठी सोयीचे नाही.

गुजरात फॅक्टर देखील त्यामागे महत्त्‍वाचे मानले जात आहे. आपने आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत पूर्ण जोर लावला आहे. राज्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात जवळपास ९० लाखांहून अधिक आदिवासी बांधव असून १४ जिल्ह्यातील जय-पराजयवार थेट त्यांचा प्रभाव आहे. अशात केजरीवाल यांनी विरोधकांच्या बाजूने निर्णय घेतला तर भाजप त्यांना आदिवासी विरोधी म्हणून विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा लावून धरेल. केजरीवाल यांच्या पक्षासाठी हे सोयीचे नाही. अशात केजरीवाल अद्याप कुठल्या निर्णयापर्यंत पोहचलेले नाहीत. पंरतु, निर्णयाप्रत पोहचण्यासाठी सर्व शक्यतांचा विचार करीत राजकीय कौशल्य आपला पणाला लावावे लागणार आहे. पंजाबमध्ये पक्षाचे ९२ आमदार आहेत. तर, दिल्लीत पक्षाकडे ६२ आमदार आहेत. पंजाबमधील विजयानंतर पक्षाचे राज्यसभेतील संख्याबळ ३ वरुन ८ पर्यंत पोहचले आहे. पुढील महिन्यात राज्यसभेचे दोन खासदार निवृत्त होणार आहेत. त्यानंतर आपचे संख्याबळ १० वर पोहोचेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news