

Premanand Maharaj Disciple Death: वृंदावनमधील वाराहघाट परिसरातील आश्रमात प्रेमानंद महाराजांचे शिष्य दीपक उर्फ रसिक दुलारी शरण (वय 25) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. शुक्रवारी त्यांनी आश्रमाच्या चार मजली इमारतीच्या टॉप फ्लोअरवरून उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दीपक यांचा प्रायव्हेट पार्ट कापलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. त्यांनी स्वत: जीवन संपवलं की त्यांच्या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दीपक राहत असलेल्या खोलीची तपासणी केली असता तेथे रक्ताने माखलेला ग्राइंडर आढळून आला. प्राथमिक तपासात प्रायव्हेट पार्ट कापण्यासाठी याच ग्राइंडरचा वापर झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र हे कृत्य दीपक यांनी स्वतः केले की अन्य कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत. दीपक यांचा मोबाइल आणि डायरीही पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यातून काही महत्त्वाची माहिती मिळते का, याचा तपास केला जात आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आश्रम आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे. त्यामध्ये दीपक इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरून उडी मारताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र त्यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. प्रायव्हेट पार्ट कापलेल्या अवस्थेत आढळल्याने पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी केला जात आहे.
दीपक उर्फ रसिक दुलारी शरण हे मूळचे मध्य प्रदेशातील जबलपूरचे रहिवासी होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी जबलपूरमध्ये मन न लागल्याने ते वृंदावनमध्ये आले होते. धार्मिक प्रवृत्ती असल्याने त्यांनी प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांचे नाव रसिक दुलारी शरण झाले.
ते वाराहघाट परिसरातील राधा वाटिकेजवळ असलेल्या चार मजली इमारतीत राहत होते. या इमारतीत प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा घेतलेले शिष्य राहत असल्याची माहिती आहे.
वृंदावनमध्ये येण्यापूर्वी दीपक यांनी नर्मदा परिक्रमा केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. एकदा वृंदावनला आल्यानंतर ते जबलपूरला परतले होते. मात्र सुमारे दोन वर्षांपूर्वी पुन्हा वृंदावनला आल्यानंतर ते कायमचे तिथेच राहिले.
दीपक यांचा भाऊ मनीष पटेल यांनी सांगितले की, दीपक यांना धार्मिक कार्याची आवड होती. त्यांनी कॉलेजपर्यंत शिक्षण घेतले होते आणि अभ्यासातही ते चांगले होते. मात्र जबलपूरमध्ये त्यांचे मन लागत नव्हते.
वृंदावनला गेल्यानंतर कुटुंबीयांशी त्यांचा फारसा संपर्क होत नव्हता. कुटुंबीय वृंदावनला गेले की त्यांना आश्रमाऐवजी इतर ठिकाणी राहावे लागत असे. त्यामुळे दीपकसोबत काही काळासाठीच भेट होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
दीपक यांच्या आई लोंग बाई पटेल यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी दुपारी सुमारे एक वाजता कुटुंबीयांना फोन करून दीपक यांची तब्येत खराब असल्याची माहिती देण्यात आली.
गेल्या वर्षी त्या दीपक यांना भेटण्यासाठी वृंदावनला गेल्या होत्या. त्यावेळी त्या सुमारे पाच दिवस वृंदावनमध्ये राहिल्या होत्या. दीपक यांनी त्यांना मथुरा-वृंदावन परिसर फिरवून दाखवला होता.
रुग्णालयातून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत.
दीपक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासातून मृत्यूचे नेमके कारण तसेच प्रायव्हेट पार्ट कापण्यामागील कारणही स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी आश्रमातील सीसीटीव्ही फुटेज, दीपक यांचा मोबाइल, डायरी आणि घटनास्थळावरील इतर पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे. दीपक यांनी जीवन का संपवलं? त्यांचा प्रायव्हेट पार्ट नेमका कसा कापला गेला? या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत.