

Pregnant woman killed
धौलपूर : हुंड्यासाठी एका चार महिन्यांच्या गर्भवती महिलेची तिच्या सासरच्या मंडळींनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्यांनी महिलेच्या माहेरच्या लोकांना कोणतीही माहिती न देता तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आणि गावातून पळ काढला.
राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. २४ वर्षीय गुडीया असे मृत महिलेचे नाव असून तिचा विवाह इच्छापुरा गावातील पंकज ठाकूर याच्याशी झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सासरी गुडीयाची हत्या करण्यात आली. त्यानंतर सासरच्यांनी तिच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार केले. गुडीयाच्या मोठ्या बहिणीने तिच्या आई-वडिलांना याबद्दल सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जेव्हा माहेरचे लोक सासरच्या गावात पोहोचले, तेव्हा त्यांना गुडीयाची चिता जळताना दिसली. त्यांनी तातडीने पाणी ओतून आग विझवली आणि स्थानिक पोलिसांत धाव घेतली.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी असलेले मृत गुडीयाचे वडील देवेंद्र सिंह परमार यांनी तक्रार दाखल केली आहे. २८ मे २०२५ रोजी गुडीयाचे लग्न झाले होते. लग्नाच्या वेळी १५ लाख रुपये रोख, मोटारसायकल, घरगुती वस्तू आणि दागिने हुंडा म्हणून देण्यात आला होता. तरीही, सासरच्या मंडळींकडून कार, सोन्याची चेन आणि म्हशीची मागणी केली जात होती. या कारणावरून गुडीयाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असे. गुडीया चार महिन्यांची गर्भवती होती आणि घरात अनेक खोल्यांमध्ये रक्ताचे सडे पडलेले होते, असेही वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.
पंकज हा गुडीयाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत असे, असाही आरोप वडिलांनी केला आहे. गुडीयाचे तिच्या बहिणीच्या पतीसोबत अवैध संबंध असल्याचा संशय पतीला होता. पोलीस अधिक तपास करत आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने घटनास्थळीच शवविच्छेदन केले आणि डीएनए विश्लेषणासाठी नमुने घेतले. घरामध्ये रक्ताचे डाग आणि कुऱ्हाड, फावडे, काठ्या यांसारखी शस्त्रे आढळून आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पती पंकज ठाकूर याला अटक केली असून कुटुंबातील इतर सदस्य फरार आहेत.