

Pratik Bhushan Death Threat: माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी नुकतेच राम मंदिरातील भक्तांकडून आलेल्या दानमध्ये घोटाळा झाला असल्याचं वक्तव्य केलं होतं. यात मोठी नावे असून जर मी ती उघड केली तर माझ्या जीवाला धोका आहे असं देखील ते म्हणाले होते. यानंतर आता अयोध्येतील राम मंदिरातील कथित घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे.
त्यातच आता माजी खासदार आणि महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या बृजभूषण सिहं यांच्या मुलाला प्रतीक सिंहला जीवे मारण्याची धमकी आली आहे. याबाबतचा धमकीचा फोन राजस्थानमधून आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे धमकी प्रकरण दोन दिवस जुनं आहे. आमदार प्रतीक भुषण सिंह यांना खासगी मोबाईल नंबरवर एका अज्ञाताने कॉल केला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने आमदारांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर प्रतीक भूषण सिंह यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या धमकीनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पोलिसांनी सांगितलं की, आमदारांचे प्रतिनिधी अजय सिंह यांनी या प्रकरणी गोंडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. यात धमकी दिल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरूवातीच्या तपासात धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीची संदीप शर्मा अशी ओळख पटलवली आहे. तो राजस्थानमधील अलवर जिल्ह्याचा रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या प्रकरणाचे गांभिर्य पाहून पोलीस ठाण्याने गुन्हा नोंद केला असून पुढची कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलीस प्रशासन आरोपीला अटक करण्यावर भर देत असून धमकीच्या फोन कॉल्सची तांत्रिक पडताळणी देखील केली जात आहे. प्रतीक यांना कोणत्या कारणांमुळे ही धमकी आली असेल याचा देखील तपास पोलीस करत आहेत.