Crime News: वेब सीरिज पाहून प्लॅन, पाच महिने तयारी आणि जळालेली कार; अल्पवयीन मुलाने कुटुंबातील चौघांची हत्या कशी केली?

अजमेर जिल्ह्यातील माजी सरपंच रामसिंह चौधरी, त्यांची दुसरी पत्नी, आई आणि भाची यांच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे.
Rajasthan crime news
Rajasthan crime newsfile photo
Published on
Updated on

Rajasthan crime news

अजमेर: कौटुंबिक कलह, वारसा हक्कावरून होणारे वाद आणि वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर आईला मिळत असलेली चुकीची वागणून यामुळे १७ वर्षीय मुलाने वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट रचला. ५ महिन्यांपासून नियोजन केले, खून कसा करायचा आणि पुरावे नष्ट कसे करायचे, यासाठी गुन्हेगारीवर आधारित सिरीयल पाहिल्या आणि शेवटी थंड डोक्याने प्लॅन आखला.

राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील माजी सरपंच रामसिंह चौधरी, त्यांची दुसरी पत्नी, आई आणि भाची यांच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे. सुरुवातीला जळालेल्या कारमधील मृतदेह पाहून अपघात असल्याचे समजले जात होते. मात्र पोलिस तपासात हा प्रकार हत्येचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, या प्रकरणात रामसिंह चौधरी यांच्या १७ वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे.

Rajasthan crime news
Kalyan Wife Murder: 9 वर्षांच्या मुलासमोरच पत्नीचा खून; कल्याणात पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला नाशकातून अटक

अल्पवयीन मुलाचे संशयास्पद वागणे, अन् पोलिसांचा संशय बळावला

रामसिंह चौधरी, त्यांची दुसरी पत्नी सुर्ग्यान, आई पुसी देवी आणि भाची महिमा यांचे मृतदेह जळालेल्या स्कॉर्पिओमध्ये आढळून आले होते. कुटुंबीय शोकाकुल असताना पोलिसांचे लक्ष एका गोष्टीकडे गेले. चौधरी यांचा अल्पवयीन मुलगा या घटनेनंतरही शांत दिसत होता. आई रडत असताना तो तिच्या शेजारी बसून तिला धीर देत चहा पीत होता. त्याच्या या वागण्यामुळे पोलिसांना संशय आला आणि तपासाची दिशा बदलली.

५ महिन्यांचे नियोजन, चाकूचे वार, जळालेली गाडी

सुरुवातीला कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, रामसिंह चौधरी आपल्या आजारी आईला रुग्णालयात घेऊन जात असताना वाहनाला आग लागली आणि आत असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला. मात्र तपासादरम्यान या कथनातील अनेक विसंगती समोर आल्या. पोलिसांना वाहनाच्या पुढील सीटवर कोणीही बसले नसल्याचे आढळले. तसेच मृतांपैकी सुर्ग्यान यांच्या शरीरावर आगीपूर्वीच चाकूचे वार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अपघाताचा तपास थेट हत्येच्या दिशेने वळला. चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलाने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अजमेरचे पोलिस अधीक्षक हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामसिंह चौधरी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर कुटुंबात मतभेद निर्माण झाले होते. वडिलांचे आईसोबत योग्य वर्तन नाही, अशी भावना मुलाच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे वडिलांविषयी नाराजी वाढत गेली. मुलाला घरातील वातावरणात स्वतःवर बंधने असल्याची भावना होती. अनेक वर्षांपासून सुरू असलेले तणावाचे वातावरण हळूहळू तीव्र होत गेले.

रामसिंह चौधरी अजमेरपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावरील श्रीरामपुरा गावातील एका फार्महाऊसमध्ये राहत होते. त्यांच्या दोन पत्नी, आई आणि भाचीही त्यांच्यासोबत राहत होती. तपास अधिकाऱ्यांच्या मते, अल्पवयीन मुलगा सुमारे पाच महिन्यांपासून या हत्येचा कट रचत होता. तो नियमितपणे गुन्हेगारीवर आधारित वेब सीरिज पाहत असे. तसेच ऑनलाइन गेम खेळायचा. तपासात असेही समोर आले की, गुन्हेगार पुरावे कसे नष्ट करतात, पोलिस तपास कसा होतो आणि गुन्ह्याची जागा कशी हाताळली जाते, याचा तो अभ्यास करत होता.

घटनेच्या रात्री नेमकं काय घडलं?

घटनेच्या रात्री रामसिंह चौधरी आणि त्यांची दुसरी पत्नी सुर्ग्यान बिअर प्यायले आणि झोपले. पोलिसांच्या मते, अल्पवयीन मुलगा पहाटे सुमारे चार वाजेपर्यंत मोबाईलवर गेम खेळत जागाच होता. यानंतर तो वडिलांच्या खोलीत गेला. त्याने वडिलांच्या कानाजवळ चाकूने वार केला. हा वार जीवघेणा ठरला. मात्र त्यानंतर जे घडले ते त्याच्या नियोजनात नव्हते. शेजारी झोपलेल्या सुर्ग्यान जाग्या झाल्या आणि त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा ऐकून पुसी देवी आणि महिमा खोलीत आल्या. त्यानंतर आरोपीची आई म्हणजेच रामसिंह चौधरी यांची पहिली पत्नी आणि त्याची बहीणही घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनीही सुर्ग्यान, पुसी देवी आणि महिमा यांच्या हत्येत मदत केली.

चौघांची हत्या केल्यानंतर हा प्रकार रस्ते अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेह स्कॉर्पिओमध्ये ठेवून कार पेटवून देण्यात आली. आगीत सर्व पुरावे नष्ट होतील, अशी आरोपींची अपेक्षा होती. मात्र दोन महत्त्वाच्या बाबींमुळे संपूर्ण कट उघडकीस आला. पहिली म्हणजे एका मृतदेहावरील चाकूचे वार आणि दुसरी म्हणजे जळालेल्या वाहनात सर्व मृतदेह मागील भागात आढळणे. याशिवाय घटनेनंतर अल्पवयीन मुलाचे शांत वर्तनही पोलिसांच्या संशयाचे कारण ठरले. याच धाग्यांवरून तपास पुढे सरकला आणि राजस्थानमधील या थरारक चौघांच्या हत्याकांडाचे गूढ पोलिसांनी उलगडले.

Rajasthan crime news
Crime News: लग्नाच्या नवव्या दिवशी वडिलांनीच केली नवविवाहित लेकीची हत्या; शीर धडावेगळे केले, धक्कादायक कारण आलं समोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news