
नवी दिल्लीः बिहारमधील आगामी पोटनिवडणूक पुढे ढकलण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी प्रशांत किशोर यांच्या पक्षाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. प्रशांत किशोर यांच्या ‘जन सूराज’ पक्षाने छटपूजेचे कारण देत बिहारमधील ४ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने नमूद केले की, छठपूजेचा हवाला देऊन याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, छटपूजा हा सण अगोदरच संपला आहे. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही. कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने बिहारमधील निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केलेली नाही. १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचे निर्देश दिले जाऊ शकत नाहीत, असे खंडपीठाने सांगितले. दरम्यान, बिहारमधील तरारी, रामगढ, बेलागंज आणि इमामगंज या चार विधानसभा जागांवर १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.