

नवी दिल्ली : शिक्षण हे प्रगतीचे द्वार आहे, पण अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. हीच अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान यशस्वी (PM YASASVI) शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EBC) आणि भटक्या-विमुक्त जमातींमधील (DNT) गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये उत्तम शिक्षण घेता यावे यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा आहे. पात्र विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (National Scholarship Portal) scholarships.gov.in वर जाऊन ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
'या' योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजेनुसार भरीव आर्थिक मदत दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer - DBT) प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. यामुळे ही प्रक्रिया अत्यंत वेगवान आणि पारदर्शक होते.
इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी : ७५ हजार रुपये (प्रति वर्ष)
इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी : १ लाख २५ हजार रुपये (प्रति वर्ष)
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
विद्यार्थी इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बळ (EBC) किंवा भटक्या-विमुक्त जमाती (DNT) या प्रवर्गातील असावा.
अर्ज करणारा विद्यार्थी सध्या इयत्ता ९ वी किंवा ११ वी मध्ये शिकत असावा.
विद्यार्थ्याच्या पालकांचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अर्जदार सरकारने निश्चित केलेल्या नामांकित शाळांपैकी (Top Class School) एका शाळेत शिकत असावा.
या निकषांमुळे गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल याची खात्री केली जाते.
अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि आधार-आधारित आहे.
सर्वात आधी, गुगल प्ले स्टोअरवरून "NSP OTR" हे ॲप डाउनलोड करा.
या ॲपद्वारे आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन (चेहऱ्याची ओळख) प्रक्रिया पूर्ण करा. वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) क्रमांक मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे.
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक वापरा.
जर विद्यार्थी अल्पवयीन असेल आणि त्याचे स्वतःचे आधार कार्ड नसेल, तर पालकांच्या आधार कार्डचा वापर करता येईल.
एकदा OTR क्रमांक तयार झाल्यावर, scholarships.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा आणि शिष्यवृत्तीचा अर्ज काळजीपूर्वक भरा.
'यशस्वी' योजना हा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या OBC आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांचे शाळा गळतीचे प्रमाण कमी होऊन त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे, पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा आणि वेळेपूर्वी आपला अर्ज सादर करावा.