

Thane Scholarship Scheme
ठाणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या सेवा सहयोग संस्थेच्या विद्यार्थी विकास योजनेतून गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती स्वरूपात मदत दिली जाते. दहावीमध्ये ९० टक्के, बारावीत ७० टक्के आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेत चांगल्या दर्जाच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतील इतके गुण मिळवणारे गरजू विद्यार्थी या योजनेत मदत मिळण्यास पात्र ठरतात. संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी संस्थेच्या जिल्हानिहाय कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
ठाण्यातील सेवा सहयोग संस्थेच्या विद्यार्थी विकास योजनेतून गेल्या १७ वर्षात ३६ जिल्ह्यातील २ हजार ३९६ विद्यार्थ्यांना २७ कोटी ३१ लाख रूपये शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात आले. २०२४-२५ या आर्थिक वर्षात १ हजार ३१ विद्यार्थ्यांना संस्थेने ६ कोटी २५ लाख रूपये शिक्षणासाठी मदत केली. या १७ वर्षात संस्थेने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आठ शाळा इमारतीच्या पुनर्निर्माणासाठी ७ कोटी ५९ लाख रूपये उपलब्ध करून दिले आहेत.
समाजातील नव्या पिढीतील गुणवत्तेला न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक रविंद्र कर्वे यांनी केले आहे. इच्छुकांनी जिल्हानिहाय संपर्क यादीची लिंक https://bit.ly/VVY-mentors जाऊन संपर्क साधावा.
महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान आणि झारखंड या राज्यात ही शैक्षणिक चळवळ पोहोचली आहे. 'टीजेएसबी' बँकेचे सीईओपदावरून निवृत्त झाल्यावर रविंद्र कर्वे यांनी समविचारी मित्रांसह ठाण्यात २००८ मध्ये विद्यार्थी विकास योजना संस्थेची स्थापना केली. वर्षांगणिक संस्थेची व्याप्ती वाढत आहे.
६२३ देणगीदार आणि ५०० शुभचिंतकांच्या सहकार्याने संस्थेचे कार्य सुरू असून या उपक्रमाद्वारे मार्च अखेरपर्यंत ३४ कोटी ९० लाख रूपयांचा निधी शैक्षणिक कार्यासाठी संकलीत झाला आहे. संस्थेच्या मदतीने शिक्षण पूर्ण करून नोकरी लागलेल्या माजी विद्यार्थ्यांनी बांधिलकी मानून आतापर्यंत ६३ लाख ५७ हजार रूपये संस्थेकडे सूपूर्द केले आहेत. संस्थेच्या एकुण निधी संकलनात माजी विद्यार्थ्यांचे सध्याचे योगदान दोन टक्के असले तरी ते भविष्यात वाढत जाणार आहे.