

PM Narendra Modi Balasaheb Thackeray 100th birth anniversary
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना १०० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. "तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणाऱ्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भावपूर्ण आदरांजली," अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, "राजकारणाबरोबरच बाळासाहेबांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू."
संजय दत्तमुळे राऊत आणि बाळासाहेब ठाकरेंमध्ये झाला होता वाद
संजय राऊत यांचं नाव आलं की राजकारणात हमखास चर्चा रंगते. कुणी त्यांच्यावर टीका करतो, तर कुणी त्यांना शिवसेनेचा आवाज मानतो. पण एक गोष्ट नाकारता येत नाही, संजय राऊत हे अनेक वर्षांपासून ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या वर्तुळातले आणि शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून ओळखले जातात. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात एकदा जोरदार मतभेद झाले होते, हा जुना किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बाळासाहेबांच्या भाषणशैलीला जसं महाराष्ट्रात वजन होतं, तसंच सामनाच्या शब्दांनाही ताकद होती. ही ताकद अधिक धारदार होण्यात राऊतांचा मोठा वाटा मानला जातो. एकेकाळी “सामनात छापलेला शब्द म्हणजे सेनेचा आवाज” अशी प्रतिमा निर्माण झाली होती.
पण हे सगळं सुरळीतच होतं असं नाही.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त यांचं नाव आल्यानंतर मुंबईत वातावरण तापलं होतं. त्या काळात शिवसेनेकडून संजय दत्तविरोधात भूमिका घेतली जात होती आणि सामनामधूनही आक्रमक लिखाण होत होतं.
पण नंतर बाळासाहेब ठाकरे आणि संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त यांची भेट झाली. त्या भेटीनंतर बाळासाहेबांनी आपली भूमिका काहीशी बदलली आणि संजय दत्तबाबत मवाळ भूमिका घेतली. याच मुद्द्यावरून संजय राऊत नाराज झाले होते.