What Is PM Viksit Bharat Rojgar Yojana
भारताचा आज ७९ वा स्वातंत्र्यदिन (79th Independence Day) आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी युवकांसाठी १ लाख कोटींच्या योजनेची घोषणा केली. युवकांसाठी १ लाख कोटींची योजना आम्ही सुरू करत आहोत. पंतप्रधान विकसीत भारत रोजगार योजना आजपासून सुरू होईल. खासगी क्षेत्रात पहिली नोकरी लागणाऱ्या युवकांना १५ हजार प्रोत्साहन रक्कम दिली जाईल, असे पीएम मोदी यांनी सांगितले.
या योजनेची घोषणा करताना पीएम मोदी म्हणाले, ''मी देशातील युवकांसाठी खुशखबर घेऊन आलो आहे. आज १५ ऑगस्ट आहे. आजपासून माझ्या देशातील युवकांसाठी १ लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत आहोत. पंतप्रधान विकासित भारत योजना आजपासून लागू होत आहे.''
पंतप्रधान विकसीत भारत रोजगार योजनेसाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेचा सुमारे ३.५ कोटी युवकांना फायदा होईल. यासह नवीन नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.
पीएम मोदी म्हणाले, ''या योजनेअंतर्गत, खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळणाऱ्या युवकांना १५ हजार रुपये रक्कम दिली जाईल. ज्या कंपन्या नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करतील त्यांनादेखील प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेचा साडेतीन कोटी युवकांना फायदा होईल.''
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेअंतर्गत २ वर्षांच्या कालावधीत देशात साडेतीन कोटींहून अधिक रोजगार निर्मितीला प्रोत्साहन दिले जाईल. यापैकी १.९२ कोटी लाभार्थी पहिल्यांदाच मनुष्यबळ क्षेत्रात प्रवेश करतील. या योजनेचा लाभ १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ दरम्यान निर्मित नोकऱ्यांसाठी लागू राहील.
मी देशातील युवकांना सांगू इच्छितो की, तुम्ही नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन या, तुमच्या कल्पनांना मरू देऊ नका. आजचा तुमची कल्पना येणाऱ्या पिढीचे भविष्य असू शकतो. मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही पुढे या, हिंमत ठेवा, पुढाकार घ्या, पुढे चला, मी तुमचा सहकारी बनून काम करण्यास तयार आहे. आता देशाला थांबायचे नाही. २०४७ दूर नाही, प्रत्येक क्षण मौल्यवान आहे आणि आपण एक क्षणही गमावायचा नाही, असेही पीएम मोदी यांनी युवकांना उद्देशून म्हटले आहे.