

PM Narendra Modi On Delhi Blast
नवी दिल्ली : दिल्ली स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभे असल्याचे सांगतानाच या स्फोटाचं कारस्थान रचणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना शिक्षा होणारच, अशा शब्दात PM मोदींनी स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांना ठणकावलं आहे. आमच्या तपास यंत्रणा स्फोट घडवणाऱ्यांचे पाळेमुळे खणून काढणार आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं मोदींनी म्हटलं आहे.
लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामुळे देशाची राजधानी दिल्ली सोमवारी संध्याकाळी हादरली. हा दहशतवाद्यांनी घडवलेला बॉम्बस्फोट होता का याबाबत सुरक्षा यंत्रणांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूतानमधून दिल्ली स्फोटाबाबत भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी आज भूतानमध्ये जड अंत:करणाने आलो आहे. सोमवारी संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे सगळेच व्यथित झाले आहेत. मी पीडित कुटुंबीयांचं दु:ख समजू शकतो. आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे. मी रात्रभर सर्व सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात होतो. स्फोटाचा सखोल तपास केला जाईल. आमच्या सुरक्षा यंत्रणा षडयंत्राच्या मूळापर्यंत जातील. स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना शिक्षा होणारच.
मोदींनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्टपणे म्हटले नसले तरी दिल्लीतील स्फोटाचं दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समोर येत आहे. स्फोट घडवणाऱ्यांना शिक्षा होणारच असं म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे दहशतवादी संघटना आणि अशा संघटनांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला इशाराच दिला आहे.
बुधवारी मोदी घेणार बैठक
बुधवारी भारतात परतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत सुरक्षा दल आणि तपास यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत संरक्षण दल, गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, असे समजते.
दिल्ली स्फोटाबाबत महत्त्वाच्या अपडेट्स काय आहेत?
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ सायंकाळी ६. ५२ वाजता स्फोट झाला.
सिग्नलवर थांबलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात उघड
सोमवारी संध्याकाळी संध्याकाली ७. २९ वाजता आगीवर नियंत्रण मिळवले.
मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार स्फोटात 11 जणांचा मृत्यू.
दिल्ली स्फोटात वापरलेली कार हरियाणातील.
मंगळवारी अमित शाहांनी गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्या संशयिताचे नाव समोर. उमर नवी याने स्फोट घडवल्याचा प्राथमिक अंदाज. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू.