

PM Modi-Trump Talks
नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये वाढत्या तणावाच्या दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यात उच्च स्तरावर महत्त्वाची चर्चा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून संवाद साधत क्षेत्रातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. विशेषतः 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) खुली ठेवण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी गांभीर्याने विचार विनिमय केला.
अमेरिकन राजदूतांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील संभाषणात पश्चिम आशियातील परिस्थिती आणि सागरी सुरक्षेवर भर देण्यात आला. जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी होर्मुजची सामुद्रधुनी खुली राहणे आवश्यक असल्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले. इस्रायल-इराण तणावामुळे या भागात अस्थिरता वाढत असतानाच ही चर्चा झाली आहे.
चर्चेदरम्यान भारताने तणाव कमी करण्यावर आणि लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "होर्मुजची सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि सुलभ राहणे संपूर्ण जगासाठी अत्यंत आवश्यक आहे." दोन्ही नेत्यांनी या क्षेत्रात स्थिरता आणि शांतता राखण्याच्या प्रयत्नांसाठी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले.
या संभाषणाच्या एक दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू असून अनेक मुद्द्यांवर सहमती होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंना तडजोड हवी आहे आणि जर चर्चा योग्य दिशेने पुढे गेली तर काही दिवसांतच यावर तोडगा निघू शकतो, असे ट्रम्प म्हणाले होते. ही चर्चेची पुढाकार इराणकडून घेण्यात आली असून अमेरिका केवळ त्याला प्रतिसाद देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मात्र, इराणने ट्रम्प यांचे हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होत नसल्याचे इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी स्पष्ट केले. "अशा खोट्या बातम्या पसरवून तेल बाजार आणि जागतिक वातावरणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत आपल्या अटी पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत चर्चेचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे.
पश्चिम आशिया सध्या अत्यंत तणावपूर्ण टप्प्यातून जात आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील थेट संघर्ष वाढला असून दोन्ही बाजूंनी हल्ले आणि प्रत्युत्तराची कारवाई सुरू आहे. हा संघर्ष आता केवळ मर्यादित लष्करी कारवाईपुरता उरलेला नाही, तर इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणच्या आत शिरून हल्ले केले जात असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. दुसरीकडे, इराणनेही आखाती क्षेत्र आणि धोरणात्मक ठिकाणांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. यामुळे संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अस्थिरता पसरली असून अनेक देश 'हाय अलर्ट'वर आहेत. या तणावाचा परिणाम केवळ सुरक्षेवरच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेवरही होत आहे. विशेषतः जगातील तेलाचा मोठा हिस्सा ज्या मार्गावरून जातो, त्या 'होर्मुजच्या सामुद्रधुनी'बाबत चिंता वाढली आहे.