

PM Modi reviews security
नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेतली. भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकमेकांच्या संपर्कात राहण्यास आणि सतर्क राहण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. बैठकीत पंतप्रधान मोदींनी सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मंत्रालयांच्या नियोजन आणि तयारीचा आढावा घेतला.
पंतप्रधान मोदींनी सर्व सचिवांना त्यांच्या मंत्रालयांच्या कामकाजाचा व्यापक आढावा घेण्याचे आणि तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन प्रतिसादावर विशेष लक्ष केंद्रित करून आवश्यक यंत्रणांचे निर्दोष कामकाज सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आंतर-मंत्रालयीन समन्वयाचा आढावा बैठकीत घेण्यात आला, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, बैठकीत नागरी संरक्षण यंत्रणा मजबूत करणे, चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करणे या मुद्द्यांवर चर्चा झाली. मंत्रालयांना राज्यांचे अधिकारी आणि विविध संस्थांशी जवळून समन्वय राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
देश संवेदनशील काळातून जात असताना सतत सतर्कता, संस्थात्मक समन्वय आणि स्पष्ट संवाद साधण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, ऑपरेशनल तयारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे बैठकीत सांगितले. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही बैठक झाली.
मंत्रालये सर्व प्रकारच्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी सज्ज आहेत, असे सरकारने म्हटले आहे. या बैठकीला कॅबिनेट सचिव, पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण, गृह, परराष्ट्र, माहिती आणि प्रसारण, ऊर्जा, आरोग्य आणि दूरसंचार यासारख्या प्रमुख मंत्रालयांचे सचिव उपस्थित होते.