

Stock Market Updates
मुंबई : भारत- पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (दि.८ मे) दबाव दिसून आला. सेन्सेक्स ४११ अंकांनी घसरून ८०,३३४ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १४० अंकांच्या घसरणीसह २४,२७३ वर स्थिरावला. आजच्या सत्रात फायनान्सियल शेअर्समध्ये घसरण झाली.
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानने भारतातील १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने त्याला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा हा प्रयत्न केवळ हाणून पाडला. तसेच लाहोरमधील त्यांची हवाई संरक्षण प्रणालीही उद्ध्वस्त केली. या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. परिणामी बाजाराने सुरुवातीची तेजी गमावली आणि तो घसरणीसह बंद झाला.
क्षेत्रीय पातळीवर संमिश्र स्थिती दिसून आली. आयटी सोडून सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले.ऑटो, एफएमसीजी, बँकिंग आणि फार्मा निर्देशांक प्रत्येकी जवळपास २ टक्के घसरले. तर आयटी मीडिया निर्देशांकांनी काही प्रमाणात वाढ नोंदवली. बीएसई मिडकॅप निर्देशांक १.९ टक्के आणि स्मॉलकॅप १ टक्के घसरून बंद झाला.
बीएसई सेन्सेक्सवरील ३० पैकी केवळ ७ शेअर्स तेजीसह बंद झाले. उर्वरित २३ शेअर्स लाल रंगात रंगले. Eternal चा शेअर्स ३ टक्के घसरला. एम अँड एम, मारुती, बजाज फायनान्स, टाटा स्टील, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते २.८ टक्क्यांपर्यंत घसरले. तर एचसीएल, कोटक बँक, ॲक्सिस बँक, टायटन हे शेअर्स वाढून बंद झाले.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. जागतिक स्तरावर व्यापार युद्धाच्या तीव्रतेने निर्माण झालेली अनिश्चितता, मंदावलेली आर्थिक वाढ आणि अस्थिर महागाई पाहता अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी त्यांचा प्रमुख बेंचमार्क व्याजदर ४.२५ टक्के ते ४.५ टक्क्यांच्या श्रेणीत स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या शेअर बाजारात तेजी राहिली.
तर फेडच्या निर्णयानंतर आशियाईतील शेअर बाजारांतील वाढ मर्यादित राहिली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक आणि हाँगकाँगचा हँगसेंग प्रत्येती ०.४ टक्के वाढले. चीनचा शांघाय कंपोझिट ०.३ टक्के वाढला.