नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सबका साथ- सबका विकास, सबका विश्वास- सबका प्रयास ही संकल्पना घेऊन २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांनी केले. दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा, अशी मागणी सुनील देवधर यांनी केली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 'माय होम इंडिया' या सामाजिक संस्थेने राजधानी दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एल. मुरुगन बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संसदीय कार्य आणि केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ .एल. एस. मुरुगन यांच्यासह 'माय होम इंडिया'चे संस्थापक आणि भाजप नेते सुनील देवधर, माय होम इंडियाचे दिल्लीचे अध्यक्ष बलदेवराज सचदेवा, उत्तर-पश्चिम दिल्लीचे खासदार योगेंद्र चंडोलिया, कीर्तनकार शिरीष मोरे उपस्थित होते.
याच कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी सुनील देवधर यांनी केली. सुनील देवधर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. सावरकरांना जर भारतरत्न दिले तर भारतरत्नाचाच सन्मान होईल. सावरकरांनी कधी कुठल्या पुरस्कारासाची अपेक्षा केली नव्हती पण मला विश्वास आहे की नरेंद्र मोदी सरकार त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात सावरकरांना भारतरत्न जरूर देईल. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश त्यांच्याकडे आशेने पाहत आहे, असे सुनील देवधर म्हणाले. तसेच महापुरुष कोणत्याही राज्याचे, जातीचे, धर्माचे नसून ते समाजाला प्रेरणा देणारे असतात. म्हणून सर्वांनी एकत्र येऊन महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रम करणे गरजेचे आहे. यातूनच सामाजिक सलोखा निर्माण होईल, असेही ते म्हणाले.