

PM Modi on MLC election results : चार राज्यांमध्ये झालेल्या विधान परिषद (MLC) निवडणुकीत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. २८) एक्स पोस्ट करत खिल्ली उडवली. कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "चार मोठ्या राज्यांत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक - २८ जागांसाठी विधान परिषद निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुका मतपत्रिकांचा वापर करून घेण्यात आल्या. सांगा पाहू, काँग्रेसने किती जागा जिंकल्या असतील?" असा सवाल करत त्यांनी एका इमोजीने काँग्रेसच्या नामुष्कीजनक कामगिरीवर बोट ठेवले आहे.
ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत काँग्रेस पक्षाकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच निवडणुका मतपत्रिकांवर (बॅलेट पेपर) घेण्यात याव्यात, अशीही मागणी केली जात आहे. आता बॅलेट पेपरवर घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे.
कर्नाटकात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला. राज्यात भाजप-जेडी(एस) युतीने सर्व चारही जागा जिंकल्या आहेत. यामध्ये बंगळुरू शिक्षक मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघातील मागील निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी झाला होता.
उत्तर प्रदेशात भाजपने चार जागा जिंकल्या आहेत. तर समाजवादी पक्षाला दोन जागा मिळाल्या; इतर मतदारसंघांतील मतमोजणी सुरू आहे.
बिहारमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही फटका बसला. प्रशांत किशोर यांच्या 'जन सुराज' पक्षाने काँग्रेसचे विद्यमान सदस्य मदन मोहन झा यांचा पराभव करून आपली पहिली विधान परिषद जागा जिंकली. आरजेडीने पाटणा शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ सदस्य नवल किशोर यादव यांचा पराभव करून ती जागा आपल्या ताब्यात घेतली आहे.