PM Narendra Modi | सरकारकडून २१ व्या शतकाच्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण
नवी दिल्ली: केंद्र सरकार २१ व्या शतकाच्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. भविष्यातील आव्हानांसाठी तरुणांना तयार करण्यात शिक्षण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते, असे ते म्हणाले. नवी दिल्लीतील ‘युगम परिषद’ कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कल्पनेपासून ते वास्तवापर्यंतचा प्रवास कमीत कमी वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टॅलेंट (प्रतिभा), टेम्परामेंट (स्वभाव) आणि टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) ही त्रिसूत्री भारताचे भविष्य बदलेल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, डॉ जितेंद्र सिंह, जयंत चौधरी, डॉ सुकांता मजुमदार आदी उपस्थित होते.
कोणत्याही राष्ट्राचे भविष्य तरुणांवर अवलंबून असते. भविष्यासाठी त्यांना सज्ज करण्यात शिक्षण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक शिक्षण मानके लक्षात घेऊन तयार केले आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण बदल निदर्शनास आले असल्याचे ते म्हणाले.
आजचे तरुण केवळ संशोधन आणि विकासातच अग्रेसर आहेत असे नाही, तर ते प्रचंड उत्साही आणि धाडसी झाले आहेत. युवाशक्ती नवनवीन क्षेत्रात शोध लावत आहे, त्यामुळे भारतातील विद्यापीठ परिसर नवनवीन उपक्रमशील केंद्रे म्हणून उदयास येत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्रतिभा, स्वभाव आणि तंत्रज्ञान ही त्रिसूत्री भारताला यशोशिखरावर नेणार
जागतिक स्तरावरील उत्कृष्ट २ हजार संस्थांमध्ये भारतातील ९० पेक्षा जास्त विद्यापीठे आहेत. गेल्या दशकापासून जगातील उत्कृष्ट ५०० उच्च शिक्षण संस्थांमध्ये भारतीय संस्थांचे प्रतिनिधित्व वाढत आहे. २०१४ मधे ९ भारतीय संस्था जगातील उत्कृष्ट शिक्षण संस्थांमध्ये होत्या त्यांची संख्या २०२५ मध्ये ही आकडेवारी ४६ वर गेली आहे. भारतीय तरुणांमध्ये नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. एकत्रित प्रतिभा, स्वभाव आणि तंत्रज्ञान ही त्रिसूत्री भारताला यशाच्या शिखरावर नेईल, असे पंतप्रधान म्हणाले.
पुढील २५ वर्षात विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. कल्पनेपासून ते वास्तवापर्यंतचा प्रवास शक्य तितक्या कमी वेळात पूर्ण करायचा आहे, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, अडवान्स्ड अनॅलिटिक्स, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान आणि कृत्रिम जीवशास्त्र यांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, उच्च दर्जाचे डेटासेट आणि संशोधन सुविधा निर्माण करण्यासाठी भारत-एआय मिशनची सुरुवात केल्याचा त्यांनी उल्लेख केला.
''मोठे लक्ष्य, वेळ कमी''
कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्या समोर मोठे लक्ष्य आहे आणि वेळ कमी आहे. हे सध्याच्या परिस्थितीसंबंधी बोलत नसल्याचे ते म्हणाले. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पलटवार करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानाची चर्चा होत आहे.

