

नवी दिल्ली: संसद आणि विधिमंडळामध्ये अडथळामुक्त, पद्धतशीर चर्चा आणि उत्कृष्ट संवादाची परंपरा कायम राहिली पाहिजे, असे प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. संसद आणि विधिमंडळातील घटत्या चर्चा सत्रांच्या संख्येवर त्यांनी चिंता व्यक्त केली. सर्व पीठासीन अधिकाऱ्यांचा हा प्रयत्न असायला हवा की सभागृहांमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये, सहमती आणि असहमती असली तरी आपली सभागृहे चांगल्या वातावरणात चालली पाहिजेत, असे ते म्हणाले. पाटणा येथे आयोजित ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्रात बिर्ला यांनी हे प्रतिपादन केले.
ओम बिर्ला म्हणाले की, सर्व पीठासीन अधिकाऱ्यांनी संविधानाचा ७५ वा वर्धापन दिन सण म्हणून साजरा करण्यासाठी रचनात्मक कल्पना दिल्या आहेत. यामध्ये भारताची संसद आणि सर्व राज्यांची विधानसभा - पंचायती राज संस्था, नागरी संस्था, सहकारी संस्था, युवक, महिला, विद्यार्थी, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था, उद्योजक, प्रसारमाध्यमे आणि लोकशाहीचे सर्व भागधारक या सर्वांचा वर्षभर सहभाग असेल. देशाच्या कानाकोपऱ्यात आपली महान लोकशाही बळकट करण्यासाठी मोहीम राबवणार आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भारताची संसद जगातील सर्व संसदांपेक्षा पुढे असल्याचे लोकसभेच्या अध्यक्षांनी अधोरेखित केले. त्यांनी माहिती दिली की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय वापरून, भारताच्या संसदेत २२ पैकी दहा अधिकृत भाषांमध्ये एकाचवेळी भाषांतर केले जात आहे आणि लवकरच ही सुविधा सदस्यांना सर्व बावीस भाषांमध्ये उपलब्ध होईल. एआयच्या माध्यमातून भारताच्या संसदेतील सदस्यांना दहा प्रादेशिक भाषांमध्ये सर्व प्रकारची संसदीय कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात आहेत, असे सांगून बिर्ला यांनी भारत ही जगातील एकमेव लोकशाही आहे. ज्यामध्ये सर्व भाषांतर करण्याची क्षमता आहे याबद्दल आनंद व्यक्त केला.