

मुंबई ः ग्रामीण भागातील नवकल्पना असलेल्या तरुणांचा उद्योगांत सहभाग वाढवणार असून, शासकीय आणि खासगी विद्यापीठे या भविष्यातील स्टार्टअपला बळकटीकरण देणार्या संस्था आहेत. विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे बनवले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमात दिली. राज्यात नावीन्यता शहरांची स्थापना करणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी याप्रसंगी केली. या कार्यक्रमात त्यांनी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीपप्रज्वलन केले.
भारतीय लघू औद्योगिक विकास बँकेच्या माध्यमातून (सिडबी) स्टार्टअपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून राज्यातील प्रत्येक प्रादेशिक विभागासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
नवे उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे. देशात स्टार्टअप सुरू झाले तेव्हा 471 स्टार्टअप होते. आज देशात एक लाख 57 हजार स्टार्टअप आहेत. महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाही, तर त्याचे नेतृत्व करत आहे, असे ते म्हणाले.