PM Mementos E-Auction: पंतप्रधानांच्या वस्‍तूंच्‍या ई-लिलावात महाराष्ट्राशी संबंधित ८९ स्मृतिचिन्हे

शिवरायांचा वारसा, संतपरंपरा, वारली कला, क्रीडा आणि आधुनिक विकासाचे दर्शन; २ ऑक्टोबरपर्यंत ई-लिलावात सहभागी होता येणार
PM Mementos E-Auction
PM Mementos E-AuctionPudhari
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेल्या स्मृतिचिन्हांच्या २०२६ मधील ई-लिलावात महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशासोबतच लोककला आणि आधुनिक विकासाची विविधांगी झलक पाहायला मिळत आहे. सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत आयोजित या राष्ट्रीय उपक्रमात महाराष्ट्राशी संबंधित ८९ स्मृतिचिन्हांचा समावेश केला आहे.

शिवरायांच्या वारसा, संत परंपरेचे दर्शन...

या संग्रहात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी वारसा विशेष आकर्षण ठरला आहे. सिंहासनाधिष्ठित तसेच अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा, युद्धप्रसंग दर्शविणारी शिल्पे, ऐतिहासिक दरबाराचे चित्रण, रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती, चांदीची मूर्ती, लाकडी नक्षीकाम आणि कॅनव्हासवरील कलाकृतींचा यात समावेश आहे.

PM Mementos E-Auction
Bengaluru AI Camera Error : गिटारला हेल्मेट नसल्याने दुचाकीस्वाराला दंड

महाराष्ट्राच्या संतपरंपरेचेही प्रभावी दर्शन या संग्रहातून घडते. संत तुकारामांची वीणेसह भावपूर्ण प्रतिमा आणि संत ज्ञानेश्वरांची ध्यानस्थ मुद्रा दर्शविणाऱ्या कलाकृती वारकरी परंपरेची आध्यात्मिक समृद्धी अधोरेखित करतात.

वारली चित्रकलेला स्थान

वारली चित्रकलेला यामध्ये विशेष स्थान असून, वारली भरतकामातून साकारलेले भगवान बिरसा मुंडा यांचे चित्र, ग्रामीण जीवन, शेती, सण-उत्सव आणि आदिवासी जीवनशैलीचे चित्रण करणाऱ्या विविध कलाकृती तसेच पारंपरिक कापडावरील हस्तचित्रे या संग्रहाची शोभा वाढवतात.

क्रीडा क्षेत्राचे प्रतिबिंब

महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे प्रतिबिंबही या स्मृतिचिन्हांत उमटले आहे. दिव्यांग बॅडमिंटनपटू सुकांत कदम यांची स्वाक्षरीयुक्त बॅडमिंटन रॅकेट, तसेच पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे गोळाफेकपटू सचिन खिलारी यांची क्रीडा बॅग आणि स्पर्धेत वापरलेला अधिकृत गोळा यांचा समावेश आहे.

PM Mementos E-Auction
TV, AC, फ्रीज, वॉशिंग मशिन महागणार? १ ऑक्टोबरपासून इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमती ३ ते १० टक्क्यांपर्यंत वाढण्याचे संकेत

२ ऑक्टोबरपर्यंत सहभागाची संधी

पंतप्रधानांकडील स्मृतिचिन्हांच्या ई-लिलावाचे हे आठवे वर्ष असून, २०२६ चा ई-लिलाव २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नागरिकांसाठी खुला आहे. महाराष्ट्राशी संबंधित स्मृतिचिन्हे पाहण्यासाठी तसेच ई-लिलावात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी pmmementos.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापुरुष, विमानतळांच्या प्रतिकृती

आधुनिक आणि विकसित महाराष्ट्राची झलक दर्शविणाऱ्या स्मृतिचिन्हांमध्ये वाढवण बंदर प्रकल्पाची प्रतिकृती, ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची प्रारूपे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतिकृती लक्षवेधी ठरत आहे. या माध्यमातून राज्याच्या पायाभूत सुविधा आणि भविष्योन्मुख विकासाची प्रतीके राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होत आहेत.

याशिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि श्रीमंत बाजीराव पेशवे (पहिले) यांच्या प्रतिमा व पुतळ्यांचाही या संग्रहात समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक, बौद्धिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे विविध पैलू या ई-लिलावातून समोर येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news